सांगली : सरकारचे सांगलीकडे काहीच लक्ष नाही, यामुळे शहरात गुन्हेगारी फोफावली आहे. जनतेच्या सहकार्याने भयमुक्त शहर आम्ही करू असा विश्वास आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला. महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि कॉग्रेस इच्छुकांच्या मुलाखती संयुक्तपणे घेण्यात आल्यानंतर आ. पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले, सांगलीत दिवसाढवळ्या खून होत आहेत. महिला सुरक्षित नाहीत. राज्यात आणि शहरात ज्यांच्या हाती सत्ता आहे त्यांनी लक्ष दिले नसल्याने या घटना घडत आहेत. केवळ रस्ते केल्याने शहराचा विकास होत नाही. आमच्या हातात हे शहर दिल्यावर सर्व शहरात सीसीटीव्ही कॅमेरे, स्वच्छता आणि अंमली पदार्थ व्यवसाय यांचा पूर्णपणे बंदोबस्त करू. जनतेच्या सहकार्याने भयमुक्त शहर आम्ही करुन जुने दिवस आम्ही आणू. पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याऐवजी आत्मचिंतन करावे. दिवसाढवळ्या खून अशी परिस्थिती कधीच नव्हती. ड्रग्ज पदार्थ विक्रीची साखळीचे आमची सत्ता आल्यावर उध्वस्त करू. पोलिसांची भाषा म्हणजे हुकूमशाहीचा मार्ग वाटते. ज्यांच्या तक्रारी त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे म्हणजे दडपशाही आहे .सांगलीची सुज्ञ जनता हे धुडकावून लावेल.
जनता पुरोगामी विचारांची
आमचे धोरण, आमची भूमिका स्पष्ट आहे. जिल्ह्यातील जनता पुरोगामी विचारांची आहे. जी विकासाची कामे झाली ती आम्हीच केली. आता पुन्हा आम्ही जाहीरनामा करू. हे शहर कसे पुढे न्यायचे याबाबत मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देऊन शहर प्रथम क्रमांकावर आणू. सांगली महापालिकेत देखील जनता आमच्या पारड्यात मते देईल.
राज्यातील मतदार हुशार
जे पक्षच आमचा सोडून गेले आहेत त्यांना पक्ष बदलूपणा करणारे, गद्दारी करणारे यांचा हिशोब करण्यास राष्ट्रवादी आणि काँग्रेस सक्षम आहे. त्यांच्या विरोधात संपूर्ण ताकदीने निवडणूक लढवू. निष्ठावंताची कदर करणारी सांगलीची जनता आहे. मतदार येणा-या जाणा-यांबाबत उत्तर मतदानातून देईल असा विश्वास आ. पाटील यांनी व्यक्त केला.

