सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळेगाव येथे तलवारीचा धाक दाखवून रोख रकमेसह लाखाचे दागिने लुटण्याची घटना घडली. यातील पाच आरोपी निष्पन्न झाले असून, त्यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरात घुसून तलवार आणि चाकूचा धाक दाखवत पाच जणांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा लाखाचा ऐवज लुटून पोबारा केला होता. ही घटना उळेगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथील डोंबाळेवस्ती जवळ शनिवारी रात्री घडली होती.
यासंदर्भात मारुती दत्तू शिंदे (३६ रा. उळेगाव, डोंबाळेवस्ती जवळ) यांनी फिर्याद दाखल केली होती. शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास आपल्या घरात असताना संतोष मच्छिंद्र चव्हाण (रा. तळेहिप्परगा) यांच्यासह ५ जणांनी घरात घुसून तलवार व चाकूचा धाक दाखवून २१ ग्रॅम सोन्याचे दागिने, २० हजार रुपये रोख आणि मोबाईल असा १ लाख ४ हजारांचा ऐवज लुटून पोबारा केला, असे त्यांनी फिर्यादीत म्हटले होते. त्यानुसार पोलिसांनी संतोष चव्हाण याच्यासह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक कार्तिक करीत आहेत.