बीड : परिस्थितीमुळे अनेकदा पन्नाशीच्या पुढील ज्येष्ठांना भावनिक आधाराची गरज असते. समाजातील अशाच प्रतिष्ठित व्यक्तीला जाळ््यात ओढून त्याच्याशी लग्न करायचे आणि नंतर लाखो रुपयांना गंडा घालायचा, असे अनेक प्रकार आपण पाहत असतो. बीडमध्येही नुकताच असा एक प्रकार घडला आहे. या प्रकरणी गेवराई पोलिसांत महिला आणि तिचे कुटुंबीय अशा ८ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
बीड जिल्ह्यातील गेवराई परिसरात ही घटना घडली आहे. येथील एका ५१ वर्षीय व्यक्तीच्या पत्नीचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते. त्यांना एक मुलगा, एक मुलगी असून दोघेही विवाहित आहेत. तसेच या व्यक्तीला नातवंडेही आहेत. पण तसे असले तरी आयुष्यातील एकटेपणा दूर करण्यासाठी त्यांनी दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला. दुसरे लग्न करण्यासाठी म्हणून त्यांनी औरंगाबादच्या एका वधू-वर सूचक मंडळामध्ये नाव नोंदणीही केली. याठिकाणी या संबंधित व्यक्तीची ओळख औरंगाबाच्या वैजापूर तालुक्यात शिऊर बंगला येथील ज्योती शेळके हिच्याशी झाली. लग्नासंदर्भात त्यांच्यामध्ये संवादही झाला.
यानंतर ज्योतीची आई कमलबाई, भाऊ सागर शेळके यांच्यासह ज्योतीच्या दोन बहिणी, त्यांचे पती हे सर्व गेवराईत आले. त्यांनी ज्योती आणि या व्यक्तीचा विवाह जमवला. त्यानंतर विवाहही झाला. पण लग्नानंतर काही दिवसांतच ज्योतीच्या कुटुंबीयांकडून या व्यक्तीला पैशाची मागणी होऊ लागली. या प्रकारानंतर एक दिवस संबंधित व्यक्ती कामानिमित्त बाहेरगावी गेले होते.
त्यावेळी ज्योतीने घरातील सोन्याचे ५ लाखांचे दागिने, रोख दीड लाख रुपये आणि २ लाख रुपयांच्या साड्या, कपडे असा ऐवज घेऊन पोबारा केला. गावाहून परतल्यानंतर या व्यक्तीला त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनंतर त्यांनी गेवराई पोलिस ठाण्यात दुस-या पत्नीसह तिच्या माहेरच्या इतर ७ व्यक्तींच्या विरोधात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी ८ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या महिलेने इतरांनाही गंडा घातला आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.