24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeक्राइम  स्टेटस अपडेट करून तरुणीचा निर्घृण खून; तरुणाची आत्महत्या

  स्टेटस अपडेट करून तरुणीचा निर्घृण खून; तरुणाची आत्महत्या

एकमत ऑनलाईन

कोल्हापूर : व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर मला माफ करा, मी जात आहे, गुडबाय लाईफ, असा मेसेज टाकून तरुणाने तरुणीचा निर्घृण खून केल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात घडली. गिरोली घाट (ता. पन्हाळा) येथील पांडवलेणी परिसरामध्ये चार चाकी गाडीतून नेत तरुणाने तरुणीचा नायलॉन दोरीने गळा आवळून व डोक्यात वार करून खून केला. त्याच ठिकाणी तरुणानेसुद्धा विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आज सकाळी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. लग्नाला विरोध केल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलताना तरुणीला संपवत स्वत:ही आत्महत्या केल्याने दोन्ही कुटुंबांना चांगलाच धक्का बसला आहे. दोघेही नातेवाईक आहेत. ऋतुजा प्रकाश चोपडे (वय २१, रा. खोतवाडी, ता. हातकणंगले) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. कैलास आनंदा पाटील (वय २६, रा. लिंगनूर, ता. कागल) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

दोघेही नातेवाईक असल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू होती. मात्र, याला काही नातेवाईकांचा विरोध असल्यानेच त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. कैलासला कामधंदा करत नसल्याने नातेवाईकांनी लग्नाला विरोध केला होता.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार खुनानंतर कैलासने व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर मला माफ करा, मी जात आहे, गुडबाय लाईफ, असा मेसेज टाकला. नातेवाईकांच्या ग्रुपवरही त्याने मेसेज टाकला. कैलासच्या वडिलांना रात्री आठच्या सुमारास विष प्राशन केल्याची माहिती मिळाल्यानंतर वडिलांनी तातडीने वडगाव पोलिस ठाण्यात ही माहिती दिली.

त्यानंतर कोडोली पोलिस ठाण्यात त्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर कैलासचे लोकेशन पडताळून गिरोली घाटाकडे धाव घेतली. त्यांना घटनास्थळी कैलास अत्यवस्थ अवस्थेत आढळला. त्यानंतर त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले होते. आज सकाळी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

खुनाची बातमी समजल्यानंतर ऋतुजाचे नातेवाईकही तातडीने घटनास्थळी रवाना झाले. ऋतुजा डी. फार्मसीचे शिक्षण घेत होती, तेथेच ती वसतिगृहात राहत होती. कैलास व ऋतुजा नातेवाईक आहेत. त्यामुळे या प्रकारानंतर दोघांच्या नातेवाईकांना धक्का बसला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या