वाघोली : वर्गमित्राचा चाकूने भोसकून खून केल्याप्रकरणी विद्यार्थिनीवर खुनाचा गुन्हा लोणीकंद पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिला अटक केली आहे, अशी माहिती लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार यांनी दिली.
येथील रायसोनी महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या अनुजा पनाळे हिने आपला वर्गमित्र असलेल्या यशवंत मुंढे याचा सोमवारी पहाटे त्याच्याच खाजगी वसतिगृहातील खोलीत चाकूने भोसकून खून केला. तिनेही स्वत: नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
यशवंत याचे पालक आल्यानंतर त्यांनी लोणीकंद पोलिसांत फिर्याद दिली. त्यानंतर अनुजावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तिला रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. पालकांनी यशवंतचा मृतदेह शवविच्छेदनानंतर लातूर येथे नेला. तिथे त्याच्यावर अन्त्यसंस्कार करण्यात आले. तिने एवढी टोकाची भूमिका का घेतली याबाबत तपासात अधिक बाबी निष्पन्न होतील असे पोलिस निरीक्षक पवार यांनी सांगितले.