पुणे : वडिलांच्या दुस-या लग्नाला विरोध केल्याने वडिलांनीच १३ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीचे निधन झाले आणि त्यानंतर वडील दुस-या लग्नाचा विचार करत होते. हे सगळे मुलीला पटले नाही त्यामुळे मुलीने वडिलांना दुस-या लग्नासाठी विरोध केला होता. त्यानंतर वडिलांनीच तिचा विनयभंग केला असल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी १३ वर्षीय मुलीने वारजे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही मुलगी कर्वेनगरमध्ये राहते. या मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली आहे. त्यानुसार पोलिसांनी तक्रारदार अल्पवयीन मुलीचे वडील आणि आजीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०२० पासून आजपर्यंत घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अल्पवयीन मुलीच्या आईचे निधन झाल्यानंतर वडिलांना दुसरे लग्न करायचे होते. मात्र मुलीने त्यास विरोध दर्शवला. या विरोधामुळे अल्पवयीन मुलीचे वडील संतापले होते.
त्यानंतर त्यांनी स्वत:च्याच लेकीला शिवीगाळ केली. घरात वावरत असताना तिला त्रास दिला. तसेच आजीनेही त्या मुलीला मानसिक त्रास दिला. मुलगी आजीला विनाकारण मारहाण करते म्हणत तिची बदनामी केली, असे तक्रारीत म्हटले आहे.