31.8 C
Latur
Tuesday, May 11, 2021
Homeक्राइमपुण्यात लादेन गँग उद्ध्वस्त

पुण्यात लादेन गँग उद्ध्वस्त

एकमत ऑनलाईन

पुणे : वानवडीतील खुनाच्या प्रयत्नातील फरार असलेल्या आरोपीकडून आणि त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरुन स्वारगेट पोलिसांनी ११ पिस्तुले आणि ३१ काडतुसे असा एकूण ४ लाख ५५ हजार ५०० रुपयांचा माल जप्त केला आहे. या आरोपींनी विकलेल्या दोन पिस्तुलांचा वापर वानवडी आणि वेल्हे येथील गोळीबाराच्या गुन्ह्यात करण्यात आला आहे.

बारक्या ऊर्फ प्रमोद श्रीकांत पारसे (१९, रा. आंबेगाव पठार), राजू अशोक जाधव ( २०, रा. माणगाव, ता. हवेली), बल्लूसिंग करतारसिंग शिकलीगर (४९, रा.निमखेडी, जि. बुलढाणा), लादेन ऊर्फ सोहेल मोदीन आसंगी ( २४, रा. टेल्को कॉलनी, कात्रज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत अपर पोलिस आयुक्त जालिंदर सुपेकर, उपायुक्त सागर पाटील यांनी माहिती दिली. वानवडी परिसरात काही दिवसांपूर्वी वाळु सप्लायरवर भरदिवसा गोळीबार झाला होता. त्या गुन्ह्यातील आरोपीला पिस्तुल पुरविणारा व सध्या फरार असलेल्या आरोपी बारक्या हा स्वारगेट येथील पीएमपी बसस्थानकावर मित्राची वाट पहात थांबला असल्याची माहिती स्वारगेट पोलिसांना मिळाली.

त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बारक्या याला पकडले. त्याच्याकडून २ गावठी पिस्तुले आणि ४ काडतुसे जप्त करण्यात आली. त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने राजू जाधव याला एकूण १३ गावठी पिस्तुल व काडतुसे विकण्यास दिल्याचे सांगितले. त्यानुसार राजू जाधव याला पकडून त्याच्याकडून १ गावठी पिस्तुल व ४ काडतुसे जप्त करण्यात आली. प्रमोद व राजू यांनी त्याच्या ओळखीच्या लादेन याला ४ पिस्तुले विकल्याचे सांगितले. त्यावरुन पोलिसांनी लादेन याला पकडून त्याच्याकडून ३ पिस्तुल व ८ काडतुसे जप्त केली. त्याने राजू जाधव याच्याबरोबर बुलढाणा येथे जाऊन बल्लूसिंग शिकलीगर याच्याकडून आणल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी शिकलीगर याला अटक केली.

लादेन याने त्यातील पिस्तुल संदीप धुमाळ याला विकल्याचे सांगितले धुमाळ याने वेल्ह्यामध्ये त्यामधून गोळीबार केला होता त्याला ग्रामीण पोलिसांनी पकडले असून पिस्तुल जप्त केले आहे. राजू आणि बारक्या हे दोघेही महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. राजू याचे नातेवाईक बुलढाणा जिल्ह्यातील निमखेडा येथे राहणारे आहेत. तेथे त्यांची शिकलीगर याच्याशी ओळख झाली होती त्यातून त्यांनी त्याच्याकडून पिस्तुले आणून येथे दुप्पट किमंतीला विकली होती. ही कामगिरी पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवडी, उपनिरीक्षक सुरेश जायभाय, हवालदार महेंद्र जगताप, पंढरीनाथ शिंदे, अरुण पाटील, रामचंद्र गुरव, विजय कुंभार, विजय खोमणे, महेश बारवकर, ज्ञाना बडे, मनोज भोकरे, सचिन दळवी, अमित शिंदे, वैभव शितकाल, महेश काटे, भूषण उंडे, बाबासाहेब शिंदे, शंकर गायकवाड यांनी केली.

अतिवृष्टीच्या अनुदानाची तोकडी मदत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या