सुरत : पारंपरिक चालीरीती मोडीत काढत गुजरातमधील सुरत शहरातील ३८ वर्षीय सुनेने सासूचा अंत्यसंस्कार केला.
खरे तर पारंपरिक हिंदू प्रथेनुसार स्त्रियांना स्मशानभूमीत जाण्यास किंवा अंत्यसंस्कारात भाग घेण्यास मनाई आहे. परंतु, सावनी कुटुंबाला ही परंपरा बदलायची होती. मावजी सवानी यांचे कुटुंबीय घरातील महिलांना अंत्यसंस्कारासाठी उमरा स्मशानभूमीत घेऊन गेले.
सावनी यांच्या पत्नी वसंतबेन यांचे यकृताच्या दीर्घ आजाराने वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले. एक महिन्यापूर्वी त्यांचे यकृत प्रत्यारोपणही झाले होते. विद्युत शवागारात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी मृताची मुलगी भावना, सून पूर्वी यांनी अंत्यसंस्कार केले.
वसंतबेन यांचा मुलगा धर्मेंद्र सवानी म्हणाला, पत्नीची इच्छा होती की तिने माझ्या आईच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहावे. कारण, तिनेच सेवा केली होती. तो पूर्वीचा अधिकार होता आणि घरातील सदस्यांनी तो मान्य केला.