अहमदनगर : यशस्वी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठे याला अखेर हैदराबादमधून अटक करण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार हे हत्याकांड प्रेम प्रकरणातून घडले असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील हा एक मोठा ट्विस्ट मानला जात आहे. कारण बोठे गेल्या साडेतीन महिन्यांपासून फरार होता. या प्रकरणाच्या मुळाशी नेमकं काय कारण आहे, याबाबत बोलताना पोलिसांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे. पोलिस अद्याप या प्रकरणाचा तपास करत असल्याची प्रतिक्रिया नगर पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. दरम्यान अशी माहिती समोर येत आहे की प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडला आहे. भविष्यात आपली बदनामी होऊ शकते किंवा गुन्हे दाखल होऊ शकतात म्हणून बाळ बोठेने हा टोकाचा निर्णय घेतला होता.
३० नोव्हेंबर रोजी पुण्याहून अहमदनगरला येत असताना यशस्वी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटामध्ये गळा चिरून हत्या करण्यात आली. यावेळेस रेखा जरे यांच्या मुलाने एका आरोपीचा फोटो काढला होता. त्याच फोटोवरून पोलिसांनी तपास सुरू केला होता. या तपासात बाळ बोठेने सुपारी देऊन हत्या केल्याचे समोर आले होते. या प्रकरणामध्ये सागर भिंगारदिवे, आदित्य चाळके, ऋषिकेश पवार, फिरोज शेख आणि ज्ञानेश्वर शिंदे यांना अटक करण्यात आली होती. अटक केल्यानंतर त्यांनी हत्येची कबुली दिली होती मात्र बाळ बोठे त्यानंतर फरार होता. अखेर पोलिसांनी बाळ बोठेला हैदराबादच्या बिलालापूर भागातील हॉटेलमधून अटक केली.
हॉटेलच्या रूमला बाहेरून कुलूप
बाळ बोठेला हैदराबाद येथून अटक करण्यात आली आहे. बाळ बोठे ज्या रूममध्ये थांबला होता त्या रूमला बाहेरून कुलूप लावण्यात आले होते, अशी माहिती पोलीसांनी दिली. हैदराबाद येथे बाळ बोठे असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी बाळ बोठेला अटक केली. इतकेच नाही तर बाळ बोठेला मदत करणाºया इतर पाच जणांना देखील पोलिसांनी जेरबंद केले. विशेष म्हणजे ज्या रूममध्ये बाळ बोठे होता त्या रूमला बाहेरून कुलूप लावण्यात आले होते.
मुलाने केली फाशीची मागणी
बोठे याला अटक करण्यात आल्यानंतर रेखा जरे यांच्या मुलाने समाधान व्यक्त केले आहे. मात्र ज्या पद्धतीने माझ्या आईची हत्या आली, त्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे यांनी केली आहे
रुग्ण दुपटीचा कालावधी ७०० वरुन २५४ दिवसांवर