पुणे : व्हॉट्सअॅप ग्रुपमधून रिमूव्ह केल्यावरून बाचाबाची झाल्यानंतर पाच जणांनी एकाला बेदम मारहाण करत जीभ
कापल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील फुरसुंगी भागात ही धक्कादायक घटना घडली असून, याप्रकरणी ३८ वर्षीय महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार २८ डिसेंबर रोजी घडला. तक्रारदार दाम्पत्य व आरोपी एकाच सोसायटीत वास्तव्यास आहेत.
सोसायटीतील रहिवासी असणा-या व्यक्तींचा तक्रारदारांच्या पतीने ‘ओम हाईट्स ऑपरेशन’ या नावाने व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला होता. त्यात सर्व सदस्यही होते. तक्रारदार यांचे पती या ग्रुपचे ऍडमिन होते. दरम्यान, त्यांनी यातील एका व्यक्तीला जो या प्रकरणात आरोपी आहे, त्या ग्रुपमधून रिमूव्ह म्हणजे काढून टाकले.
या गोष्टीची त्यांनी तक्रारदारांच्या पतीला विचारणा केली. मात्र त्यांना काही उत्तर मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी तक्रारदारांच्या पतीला फोन करून भेटायचे आहे, असे सांगून भेटण्यास बोलावले.
त्यावेळी ग्रुपमध्ये कोणीही कसलेही मेसेज करत असल्याने ग्रुपच बंद केला असल्याचे सांगितले असता आरोपीने पाच जणांसोबत येऊन तक्रारदारांना मारहाण केली. त्यांच्या तोंडावर बुक्की मारली, या बुक्कीचा फटका इतका जोरात होता की दातासह जिभेवर त्याचा मार लागला. यात ते जखमी झाले असून त्यांच्या जिभेला टाके पडले आहेत.