अमरावती : अमरावतीतील येथील कोरोना टेस्टिंग लॅबमध्ये 24 वर्षीय तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅब घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी आरोपी लॅब कर्मचाऱ्याला अटक करुन बलात्कारासह अन्य कलमांतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे.
संबंधित तरुणी कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आली होती. त्यामुळे या तरुणीची कोरोना चाचणी करणे आवश्यक होतं. त्यामुळेच ती चाचणीसाठी लॅबमध्ये गेली असता, तिच्या गुप्तांगातील स्वॅब घेतल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा आरोपीला अटक केली. अल्पेश अशोक देशमुख (30, रा. पुसदा, जि. अमरावती), असे आरोपीचे नाव असून तो बडनेऱ्याच्या लॅबमध्ये टेक्निशियन म्हणून काम पाहतो.
संबंधित 24 वर्षीय तरुणी अमरावती इथे भावाकडे राहत असून, एका मॉलमध्ये नोकरी करते. मॉलमधील कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने, संपर्कातील 20 जणांचे स्वॅब 28 जुलैला ट्रामा केअर टेस्टिंग लॅबमध्ये घेण्यात आले. मात्र स्वॅब घेणाऱ्या आरोपी अल्पेश देशमुखने संबंधित मुलीला परत बोलावून तुमची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, तुम्हाला युरिनल तपासणी करावी लागेल, असे सांगितले.
त्यानंतर टेक्निशियनने फिर्यादी तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅब तपासणी केली. त्यानंतर टेक्निशियनने तुमची टेस्ट निगेटिव्ह असल्याचे सांगितले. गुप्तांगाद्वारे घेतलेल्या स्वॅब तपासणीबाबत तरुणीस शंका आल्याने, तिने त्याबाबत भावाला सांगितले. त्याने डॉक्टरांना विचारल्यावर त्यांनी अशाप्रकारे चाचणी करत नसल्याचे सांगितले. याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी विविध कलमांसह गुन्हा दाखल केले आहेत.
खासदार नवनीत राणा संतापल्या
सदरील प्रकारावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा चांगल्याच संतप्त झाल्या आहेत. नवनीत राणा यांनी पीडित मुलीला न्याय मिळावा यासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. ‘महिला याआधीच सक्षम झाल्यामुळे मी खासदार झाले. तर प्रतिभाताई पाटील देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्या. याच जिल्हात महिला खासदार, महिला पालकमंत्री आहेत, तरीही याच जिल्हात असे धक्कादायक प्रकार होत आहेत’ अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.
‘अमरावती येथील आरोग्य यंत्रणा पार ढासळली आहे. कोव्हिड रुग्णांचे हाल होत आहेत. कोव्हिड तपासणी करणाऱ्या खाजगी, कंत्राटी व्यक्तींची पार्श्वभूमी तपासून पाहली पाहिजे’ असेही खासदार नवनीत राणा म्हणाल्या.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया
भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ या बडनेरा येथे घटलेल्या प्रकाराबाबत चांगल्याच संतापल्या आहेत. असा प्रकार करण्याची त्या टेक्निशियनची हिंमत होते कशी ? असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. राज्यात आज महिला सुरक्षा देवाच्या भरवशावर आहेत. क्वारंटाइन सेंटरमध्येही महिला सुरक्षित नाहीत, अशी सणसणीत टीका चित्रा वाघ यांनी केली आहे. स्वॅब टेस्ट फक्त नाकाद्वारे घेतली जाते. याची सरकारने जनजागृती करावी, अशी मागणी देखील चित्रा वाघ यांनी केली आहे. कोरोनाच्या नावावर महिलांना काय काय प्रकार सहन करावे लागले असेल, हे सांगता येत नाही, अशी भीती वाघ यांनी व्यक्त केली आहे. दिशा कायद्याचं काय झालं ? असा सवाल देखील चिता वाघ यांनी यानिमित्तानं व्यक्त केला आहे.