सोलापूर : सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील पडिक असलेल्या इमारतीमध्ये एका ७२ वर्षीय महिलेचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळला आहे.
त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रजिया सलीम शेख असे मृत महिलेचे नाव असून ही महिला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बॉण्ड रायटरचे काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.
मयत महिला ही जुना विडी घरकुल परिसरात राहत होती. मागील दोन दिवसांपासून ही महिला बेपत्ता होती. त्यामुळे नातेवाईक देखील शोध घेत होते. शनिवार आणि रविवार सलग दोन दिवस शासकीय कार्यालय बंद असल्याने नागरिकांची वर्दळ देखील या भागात नव्हती. आज सकाळी लोकांना परिसरात दुर्गंधी पसरल्याचे जाणवलं. यावेळी पाहणी केली असता मृतदेह आढळल्याने सर्वांना धक्काच बसला.
या महिलेच्या मुलींनी ओळख पटताच टाहो फोडला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पथक दाखल झाले. घटनेचा पंचनामा करुन महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला आहे. महिलेच्या मृत्यूचे नेमकं कारण काय हे शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होईल. दरम्यान ही आत्महत्या आहे की खून याचा तपास पोलीस करत आहेत. तूर्तास पोलिसांनी या संदर्भात कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.