कल्याण : कल्याणमध्ये एका बोगस डॉक्टराकडून दोन रुग्णालये चालवली जात होतीया धक्कादायक घटनेचा पर्दाफाश कल्याणमधील स्थानिक महारष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला. विशेष म्हणजे हा बोगस डॉक्टर इंजिनिअर असल्याचे म्हटलं जात आहे. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. अमित शाहू असं या बोगस डॉक्टराचे नाव आहे.
एका वृत्तवाहिनीने या संदर्भात माहिती दिल्यानंतर केडीएमसी प्रशासन खळबळून जागे झाले. त्यानंतर आरोग्य विभागाने अमित शाहू या बोगस डॉक्टराकडून चावल्या जात असलेल्या साई लिला आणि माऊली मल्टीस्पेशालिटी रुग्णालयांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. रुग्णालयाचा परवाना रद्द केल्याने इतर रुग्ण बचावतील. पण ज्यांच्याकडून उपचारापोटी पैसे उकळले आहेत. त्या रुग्णांना न्याय मिळणार का? अमित शाहू आणि या दोन्ही रुग्णालयाच्या मालकावर कधी कारवाई होणार हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जावी अशी जोरदार मागणी केली जात आहे.
कल्याणमध्ये एका रुग्णावर चुकीच्या पद्धतीने उपचार करुन त्या रुग्णाला आज मृत्यूच्या दारात नेऊन ठेवले. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईक आणि मनसेकडून या प्रकरणी संबंधित व्यक्ती आणि डॉक्टरांविरोधात कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर आज बोगस डॉक्टर चालवत असलेल्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात आली आहे.
डोंबिवलीतील शास्त्रीनगर येथे राहणारे शेखर बंगेरा (67) यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर ते कोरोनामुक्त झाले. पण त्यानंतर त्यांच्या फुफ्फूसाला त्रास होत असल्याने महापालिकेच्या सूचित असलेल्या कल्याणमधील खाजगी साई लिला हॉस्पिटल येथे दाखल केले. त्याठिकाणी त्यांच्यावर 20 दिवस उपचार करण्यात आले. पण उपचारानंतरही त्यांची प्रकृती खलावली. डॉक्टरांनी कुटुंबियांना विश्वासात न घेता कल्याण पूर्वेतील चिंचपाडा येथील माऊली मल्टी स्पेशालिटी या खाजगी रुग्णालयात बंगेरा यांना दाखल केले. तिथेही त्यांच्यावर उपचार केले गेले. मात्र त्यांची प्रकृती जास्तच खलावली. बंगेरा यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर हे मूळात डॉक्टर आहेत की नाही असा संशय बंगेरा यांच्या कुटुंबियांना आला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी चौकशी केली असता संबंधित डॉक्टर हा डॉक्टर नसून इंजिनिअर असल्याचे समोर आले.
दरम्यान, रुग्णावर उपचार सुरु असताना आतापर्यंत तीन लाखांचा खर्च झाला आहे. तसेच रुग्णाच्या कुटुंबियांनी रुग्णाला दुसऱ्या खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. ‘एका इंजिनिअरला कोविड रुग्णालय चालविण्याचा परवाना कसा दिला. यात कोण दोषी आहे. त्यांच्याकडून अशा किती रुग्णांवर चुकीचे उपचार केले आहेत. तसेच त्याच्या बदल्यात किती रुपये उकळले आहेत. याचा सखोल तपास करण्यात यावा’, अशी मागणी मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी केली आहे. ‘मी त्या रुग्णावर उपचार केले नाही. दुसऱ्या डॉक्टरांनी उपचार केले आहेत. मी आता डॉक्टर नाही, परंतु माझे शिक्षण सुरु आहे, तरी मला डॉक्टर बोलू शकतात. हे कुटुंब सात लाख रुपये भरपाईसाठी मला ब्लॅकमेल करत आहेत’, असं बोगस डॉक्टर अमित शाहू यांनी सांगितले.