हैद्राबाद : एका महिन्याच्या पोटच्या बाळाला पित्याने ७० हजार रुपयांना विकल्याची संतापजनक घटना हैदराबादमध्ये घडली आहे. पोलिसांनी बाळाची सुटका केली असून त्याची रवानगी बाल कल्याण विभागाकडे केली आहे. आपल्या बाळाला पतीने विकल्याची तक्रार एका महिलेने पोलिसांमध्ये दाखल केली होती. तक्रारीची गंभीर दखल घेत हैदराबाद पोलिसांनी बाळाची शोधमोहिम सुरु केली. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तपास केला असता त्यांना गुरुवारी एका ठिकाणी ते आढळून आले. या बाळाचे आईवडील फुटपाथवर राहतात.
आपले जीवन जगण्यासाठी ते छोटी-मोठी कामे करतात. भीकही मागतात असे पोलिसांनी सांगितले आहे. फटपाथवर राहणा-या या जोडप्याकडे एक सधन कुटुंब अनेक दिवसांपासून लक्ष ठेवून होते. काही दिवसांनी या जोडप्याने बाळाच्या पित्याची रस्त्यावर भेट घेतली आणि बाळाच्या बदल्यात ७० हजार रुपयांची ऑफर दिली. याप्रकरणी जुवेनाईल जस्टिस अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला असून या बाळाची रवानगी सरकारच्या बाल कल्याण विभागाकडे केली आहे. अद्याप पुढील तपास सुरु आहे.