पुणे : मित्राने जेवायला घातले नाही म्हणून झालेल्या वादात मित्रानेच कानाचा चावा घेत कान तोडून टाकल्याची घटना पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात घडली आहे. हा सगळा प्रकार २७ जानेवारी रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास मार्केटयार्डमधील फुल मार्केटच्या पार्किंगमध्ये घडला असून याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन कुंभार (३९) आणि अनिकेत कांबळे (३५) हे दोघे गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना ओळखतात आणि कात्रज भागात एकत्र वास्तव्यास आहेत. २७ जानेवारी रोजी सचिन त्याच्या मैत्रिणीसोबत मार्केट यार्ड येथे असलेल्या फुल मार्केटच्या पार्किंगमध्ये बोलत थांबले होते.
यादरम्यान आरोपी अनिकेत कांबळे तिथे आला आणि त्याने सचिनला मला खायला दे किंवा जेवायला चल अशी विचारणा केली. यावर सचिनने नकार दिल्यानंतर अनिकेतला राग अनावर झाला आणि त्याने शिवीगाळ केली.
दरम्यान, या वादाचे रूपांतर नंतर भांडणात झाले आणि अनिकेतने सचिनला धरत त्याच्या कानाला जोरात चावा घेतला. त्याने इतका जोरात चावा घेतला की, सचिनच्या कानाची पाळी तुटून पडली आणि यात सचिन गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर सचिनने पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. याप्रकरणी आरोपी अनिकेत कांबळे याच्यावर मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात भारतीय दंडात्मक कलम ३२५, २९४, ३२३, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.