पुणे : करोना झाल्याचे नातेवाईकांना सांगितल्याने एका होम क्वारंटाईन रुग्णाने मित्राचे डोके फोडले. त्याच्या डोक्यात बिअर बाटली फोडल्यानंतर पुन्हा दगडाने मारहाण करण्यात आली. ही घटना विश्रांतवाडी येथे घडली. याप्रकरणी शुभम सुरेंद्र प्रसाद (23,रा.शांतीनगर, येरवडा) याने फिर्याद दिली आहे. त्याच्या फिर्यादीनूसार अमोल नावाच्या व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी हे मासे पकडून घरी जात होते. यावेळी आरोपी अमोल तेथे दाखल झाला. त्याने फिर्यादीने आपल्याला करोणा झाल्याचे नातेवाईकांना सांगितले असे गैरसमज करुन घेतला. यानंतर रागाच्या भरात हातातील बिअरची बाटली फिर्यादीच्या डोक्यात घातली. फिर्यादीच्या कपाळातून रक्त येऊ लागल्याने,त्यांनी कपाळावर हात ठेऊन रक्त थांबविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपीने पुन्हा खाली पडलेला दगड फिर्यादीला फेकून मारला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार आरोपीला करोणा झाल्यावर त्याच्यावर 12 जूलै पर्यंत रुग्णालयात उपचार करण्यात आले. यानंतर त्याला होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्याचा होम क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर ताब्यात घेतले जाईल. याप्रकरणाचा तपास विश्रांतवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी करत आहेत.
Read More मोबाईलचा रिमोट ऍक्सेस घेत 99 हजार रुपयांचा ऑन लाईन गंडा