27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeक्राइमबनावट नोटा चलनात आणणारे त्रिकूट जाळ्यात

बनावट नोटा चलनात आणणारे त्रिकूट जाळ्यात

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : १००, २०० आणि २ हजारांच्या बनावट नोटा चलनात आणणा-या तिघांना सिडको (औरंगाबाद) पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून २ लाख ८५ हजार २०० रुपयांच्या नोटा व छपाईचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. यातील एक आरोपी धारूर (जिल्हा बीड) येथे ग्राहक सेवा केंद्र चालवितो. त्यानेच या नोटा कलर झेरॉक्स मशिनवर छापून मित्रांकडे दिल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.

संदीप श्रीमंत आरगडे (३२, रा. वैतागवाडी, पैठण रोड), निखिल बाबासाहेब संभेराव (२९, रा. पहाडसिंगपुरा) आणि आकाश संपत्ती माने (रा. धारूर, बीड), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. टीव्ही सेंटर येथील इंदिरा गांधी मार्केट येथे बनावट नोटा चलनात आणण्यासाठी दुचाकीस्वार येणार असल्याची माहिती खब-याने पोलिसांना दिली. यावरून पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला. एका दुचाकीवरून आलेल्या आरगडे आणि संभेराव यांना पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतले व झडती घेतली असता त्यांच्याजवळ १०० रुपयांच्या ४७ नोटा, २०० रुपयांच्या ५१९ आणि २ हजारांच्या बनावट नोटा आढळल्या. १०० आणि २०० रुपयांच्या अनेक नोटांवरील क्रमांक सारखे होते.

शिवाय सर्व नोटांचा कागद हलक्या प्रतीचा होता. त्यामुळे या नोटा बनावट असल्याचे लगेच लक्षात येत होते. या नोटांविषयी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी तोंड उघडले आणि या नोटा धारूर येथील मित्र आकाश मानेकडून आणल्याची कबुली दिली. संभेराव आणि आरगडेला बुधवारी न्यायालयात हजर केले असता, त्यांना दि. ११ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

२० हजारांत लाखांच्या नकली नोटा
आरोपी आकाश हा २० हजार रुपयांमध्ये एक लाखाच्या नकली नोटा देत होता. तीन महिन्यांपासून त्याने हा गोरखधंदा सुरू केल्याची कबुली दिली. त्याने आतापर्यंत कुठे आणि आणखी किती जणांना नोटा दिल्या, याबद्दलचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

नकली नोटांचे कनेक्शन थेट धारूरशी
बीड जिल्ह्यातील धारूर शहरातील हनुमान चौकात आरोपी आकाश माने याच्या ग्राहक सेवा केंद्रावर बुधवारी सकाळी पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत २०० रुपयांच्या नकली नोटा आढळल्या असून, नकली नोटांच्या छपाई साहित्यासह औरंगाबाद पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी आकाश संपती माने (धारूर) याला सिडको (औरंगाबाद) गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने धारूर येथे छापा मारून ताब्यात घेतले.

ऑर्डरप्रमाणे द्यायचा बनावट नोटा
आरोपी आकाशने त्याच्या लॅपटॉपमध्ये २० रुपयांपासून ते २ हजारांच्या नोटेपर्यंत, अशा चलनातील विविध नोटा स्कॅनरवर स्कॅन करून पीडीएफ स्वरूप ठेवल्या. जशी ऑर्डर मिळेल तशा तो नोटांची प्रिंट काढून देत होता. लॉकडाऊन काळात त्याच्या व्यवसायाला फटका बसला. खर्चाला पैसे नसल्यामुळे त्याने थेट बनावट नोटा छापण्याचा उद्योग सुरू केला.

त्या’ तरुणाला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या