अजमेर : राजस्थानमधील अजमेरमध्ये संपत्तीच्या वादातून दोन महिलांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या महिलांनी एकमेकींचे केस ओढून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.
या हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या हाणामारीत कुटुंबातील अन्य सदस्यही सामिल होते. आश्चर्याची बाब म्हणजे या दोघी महिला एकमेकींच्या नातेवाईक आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी सायंकाळी मालमत्तेच्या वादातून दोन्ही कुटुंब समोरासमोर आले. यावेळी दोन्ही बाजूच्या महिला एकमेकांना भिडल्या. परिस्थिती अशी झाली की एकमेकांना भिडणा-या महिला शेजारीच असलेल्या पेट्रोल पंपाच्या बाहेरून जाणा-या नाल्यात पडल्या आणि तिथेही एकमेकांचे केस पकडून भांडत राहिल्या. याचदरम्यान एका कुटुंबातील तरुणानेही नाल्यात उडी घेऊन महिलांना झोडपण्यास सुरुवात केली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही बाजूच्या लोकांना पोलीस ठाण्यात नेले. याठिकाणी दोन्ही बाजूंकडून एकमेकांविरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आल्या. पोलीस अधिकारी सुरेंद्र सिंह जोधा यांनी दिलेल्या माहितीनुसार, नायरा पेट्रोल पंपाचे मालक नरेंद्र कुमार आर्य आणि त्यांच्या कुटुंबातील एक मुलगी संगीता कुमावत यांच्यात मालमत्तेवरून वाद आहे.