शिर्डी : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची पंढरपुरात मांदियाळी दिसून येत आहे, तर दुसरीकडे साईबाबांना विठ्ठलस्वरूप मानणा-या भाविकांनी शिर्डीत साईदर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. ‘शिर्डी माझे पंढरपूर’ ही आरती साईबाबा मंदिरात नित्यनेमाने म्हटली जाते. त्याचीच प्रचीती आज झालेल्या भाविकांच्या गर्दीतून दिसून येत आहे. आषाढी एकादशीनिमित्त साईबाबा संस्थानच्या वतीने साई मंदिर व मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
साईबाबा हयात असताना साईबाबांचे परमभक्त दासगणू महाराज हे आषाढीच्या वारीला दरवर्षी पंढरपूरला विठ्ठलदर्शनासाठी जात असत. दासगणूंची एकदा आषाढी वारी चुकली. विठ्ठलदर्शनासाठी आतुर झालेल्या दासगणूंना साईबाबांनी विठ्ठलाच्या रूपात दर्शन दिले. तेव्हापासून दासगणू महाराजांनी ‘शिर्डी माझे पंढरपूर’ ही रचना केली. आजही साई मंदिरात साईबाबांच्या मंगलस्नानानंतर पहाटे ‘शिर्डी माझे पंढरपूर’ हीच आरती म्हटली जाते. असंख्य भाविक साईबाबांचं विठ्ठलस्वरूप मानून दर आषाढीला साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला येतात आणि विठ्ठलरूपी साईंचं दर्शन घेऊन धन्य होतात.
आज आषाढी एकादशीनिमित्त संस्थानच्या वतीने साईबाबांच्या समाधीजवळ विठ्ठलाची प्रतिमा ठेवून साईबाबांच्या मूर्तीला तुळशीची माळ आणि सुवर्ण आभूषणे चढविण्यात आली आहेत. एरवी वर्षभर साईबाबांना फुलांची माळ घातली जाते. मात्र, फक्त आषाढी एकादशीलाच साईबाबांना तुळशीची माळ घालण्यात येते. शिर्डीला येणा-या भाविकांचा उपवासाचा दिवस लक्षात घेऊन साई संस्थानच्या प्रसादालयात आज दिवसभर साबुदाण्याची खिचडी आणि शेंगदाण्याचे झिरके प्रसादस्वरूप जेवण म्हणून भाविकांना देण्यात येत आहेत.
एरवी साईबाबांच्या प्रसादालयात चपाती, दोन भाज्या, वरण-भात आणि स्वीट असा प्रसाद भाविकांना देण्यात येतो. मात्र, महाशिवरात्री आणि आषाढी एकादशीला विशेषत: भाविकांचा उपवास असल्यामुळे साईबाबा संस्थानच्या वतीने साबुदाण्याची खिचडी आणि शेंगदाण्याचे झिरके भाविकांना प्रसाद म्हणून देण्यात येतात. आज आषाढी एकादशीनिमित्त तब्बल १२ हजार किलो साबुदाण्याची खिचडी आणि शेंगदाण्याचे झिरके साईबाबा संस्थानच्या वतीने तयार करण्यात आले असून आज दिवसभर भाविकांना हाच प्रसाद दिला जाणार आहे.
आषाढी एकादशीनिमित्त आज रात्री विठ्ठल-रुक्मिणीची प्रतिमा ठेवून साईंच्या रथाची मिरवणूक शिर्डीतून काढण्यात येणार आहे. आषाढी एकादशीनिमित्त साईबाबा संस्थानच्या वतीने साईबाबा समाधी मंदिरात आणि मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.















