लातूर : प्रतिनिधी
पेरूचा हंगाम सुरू झाला असून लातूर शहरातील फळ बाजारात दररोज मोठया प्रमाणात पेरूंची आवक होत आहे. शहरातील बाजारपेठेत आवक वाढल्याने पेरूंचे दर आवाक्यात दिसून येत आहेत. सध्या आतून लाल असणा-या तैवान पेरूला ग्राहकांची पसंधी दिली आहे. महाराष्ट्रात तैवान पेरूची लागवड अहमदनगर जिल्ह्यात मोठया प्रमाणात केली जाते. या भागातील नागरीक तैवान जातीच्या पेरूची लागवड करतात. लातूर जिल्हयातील काही भागात तैवान पेरूची लागवड मध्यम स्वरूपात केली जाते. या तैवान जातीच्या पेरूचा गर गुलाबी असतो. काही वर्षांपासून पेरूच्या मागणीत वाढ होत आहे. अनेकजण आवर्जुन पेरूचे सेवन करतात.
तैवान पेरूला शहरातील फळबाजारात वीस किलो पेरूला १००० ते १५०० रुपये असे दर मिळत आहेत. पेरूचा हंगाम साधारणपणे एक महिना ते दोन महिने सुरू असतो. गतवर्षापासून पेरूचे सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक शाळा, महाविद्यालयांबाहेर पेरूची विक्री मोठया प्रमाणात होते. शहरातील घाऊक बाजारात तैवान पेरूची मागणी वाढली आहे. शहरातील फु्रटमार्केटमध्ये तैवान पेरूची आवक मोठया प्रमाणात वाढली आहे. सध्या बाजारपेठेत दररोज १ ते १.५ टन पेरूची आवक जिल्यातील विविध भागांतून होत आहे. घाऊक बाजारात पेरूची मागणी वाढत असून, या पेरूचे वजन अर्धा ते एक किलोपर्यंत असल्यामुळे ग्राहकांचे लक्ष वेधून घेत असल्याचे किरकोळ व्यापा-यानी सागीतले.
- इंदापूर, शिर्डीचे पेरू दाखल
लातूर जिल्हयासह विविध जिल्हयातील काही भागातून तैवान पेरू बाजारपेठेत विक्रीसाठी येत असून ७० ते ८० रुपये प्रतिकिलो दराने त्याची विक्री घऊक बाजारात होत आहे. या तैवान पेरूंचे वजन अर्धा ते एक किलो आहे. त्यापेक्षा जास्त वजनाचे पेरूही बाजारात विक्रीसाठी आले आहेत. या पेरूला महाराष्ट्रातील पेरू प्रमाणे चव नसली तरीही ग्राहकांची पसंती वाढत आहे. शहरातील बाजारपेठेत जिल्हयातील ग्रामीन भागासह इंदापूर, शिर्डी व इतर ठिकाणांवरूनही पेरू विक्रीसाठी येत असल्याचे व्यापारी अखील बागवान यांनी सागीतले.