21.3 C
Latur
Tuesday, September 17, 2024
Homeमहाराष्ट्रसणासुदीच्या काळात बनावट मिठाईचा धोका!

सणासुदीच्या काळात बनावट मिठाईचा धोका!

मुंबई : सणासुदीची लगबग सुरू आहे. दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दरवर्षी सणासुदीच्या काळात मिठाईचा खप अनेक पटींनी वाढतो. सणासुदीत मिठाईचा खप वाढल्याने खाद्यपदार्थांमध्ये भेसळीचा धोकाही लक्षणीय वाढतो. या पार्श्वभूमीवर येत्या हंगामात मिठाईची वाढती मागणी लक्षात घेऊन भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण ने काही महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. एफएसएसएआयने दुकानदारांना या सणासुदीच्या काळात दुकानदारांना खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

एफएसएसएआयने देशभरात ४००० राज्यस्तरीय अधिका-यांना दुकानदारांवर निगराणी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, दिवाळी किंवा सणासुदीच्या काळात बाजारात विकल्या जाणा-या मिठाईत मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याचे दिसून येते. भेसळ करताना खाद्यपदार्थांमध्ये जास्त प्रमाणात स्टार्च मिसळला जातो. स्टार्चचे जास्त प्रमाण मूत्रपिंड आणि यकृतासाठी अत्यंत हानिकारक आहे.

मिठाईमध्येही फॉर्मेलिनचा वापर
कधी-कधी मिठाईमध्ये फॉर्मेलिनचाही वापर केला जातो. फॉर्मेलिनचा वापर सामान्यत: मृतदेह दीर्घकाळ टिकवण्यासाठी केला जातो. मिठाईमध्ये फॉर्मेलिनसारखे केमिकल वापरणे अत्यंत हानिकारक असून ते घातक आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांसाठी हे अत्यंत हानिकारक आहे. यामुळे त्यांचा जीवही जाऊ शकतो.

आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला
फॉर्मेलिनमुळे आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. यामुळे स्त्रियांना गरोदरपणामध्ये काही समस्या उद्भवू शकतात किंवा दिव्यांग मूल जन्माला येऊ शकते. त्यामुळे आईच्या जिवालाही धोका निर्माण होऊ शकतो. अशा मिठाई वृद्ध व्यक्तींच्या आरोग्यासाठी देखील खूप धोकादायक ठरू शकतात.

बनावट मिठाईपासून कसे वाचाल?
बनावट खाद्यपदार्थांपासून वाचण्यासाठी मिठाई खरेदी करताना काळजी घ्या. शक्य तितक्या वेळा बाहेरील गोड पदार्थ, मिठाई खाणे टाळण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञ देतात. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, मिठाई घरी बनवण्याचा प्रयत्न करा. मिठाईऐवजी सुक्या मेव्याचा वापर करा. मिठाई खरेदी करायची झाल्यास एफएसएसएआय मानांकित दुकानातून खरेदी करा. जिथे स्वच्छता आणि गुणवत्तेची हमी असेल, अशा ठिकाणीच मिठाई खरेदी करा.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR