Homeराष्ट्रीयप्रवाशांच्या जेवनात आढळले मेलेले किडे

प्रवाशांच्या जेवनात आढळले मेलेले किडे

वंदे भारतमधील जेवणातील प्रकार अहमदाबाद-मुंबई प्रवासातील घटना

मुंबई : भारतीय रेल्वेची शान समजल्या जाणा-या आणि हायस्पीड प्रवासासाठी ओळखल्या जाणा-या वंदे भारत एक्स्प्रेसच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अहमदाबाद ते मुंबई या मार्गावर धावणा-या वंदे भारत एक्स्प्रेसमधील अन्नात कीडा सापडल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत आयआरसीटीसीने संबंधित केटरिंग कंत्राटदाराला १० लाख रुपयांचा दंड ठोठावला असून त्याचे कंत्राट रद्द करण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे.

गाडी क्रमांक २२९६२ अहमदाबाद-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना दुपारचे जेवण देण्यात आले होते. यावेळी आदित्य डिडवानिया नावाच्या प्रवाशाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली. त्यांच्या कोचमधील किमान दोन प्रवाशांच्या जेवणात मेलेले कीडे आढळले. हा प्रकार पाहताच डब्यातील इतर प्रवाशांनीही जेवण थांबवले आणि एकच गोंधळ उडाला. प्रवाशांनी या निकृष्ट अन्नाचा व्हीडीओ आणि फोटो काढून रेल्वे मंत्रालयाला टॅग केले.

बड्या कंत्राटदाराला दणका
या रेल्वेचे केटरिंग कंत्राट मेसर्स वृंदावन फूड प्रॉडक्ट्स या कंपनीकडे आहे, जी रेल्वे क्षेत्रातील मोठी कंपनी मानल्या जाणा-या आर. के. अग्रवाल ग्रुपचा भाग आहे. प्रवाशांच्या तक्रारीनंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि आयआरसीटीसीने तातडीने सूत्रे हलवली. केवळ दंडच नाही, तर या कंत्राटदाराला ‘टर्मिनेशन नोटीस’ बजावण्यात आली आहे. तसेच ज्या बेस किचनमधून हे जेवण आले होते, ते सील करून तिथे पेस्ट कंट्रोल आणि सखोल स्वच्छतेचे आदेश देण्यात आले आहेत.

गेल्या महिन्यातही घडला होता असाच प्रकार
वंदे भारतमधील अन्नाच्या दर्जाबाबतची ही पहिलीच घटना नाही. अवघ्या महिनाभरापूर्वी १५ मार्च २०२६ रोजी पाटणा-टाटानगर वंदे भारत एक्स्प्रेसमध्येही अन्नात कीडा सापडला होता. त्यावेळी रेल्वेने कडक पावले उचलत संबंधित सेवा पुरवठादारावर ५० लाख रुपयांचा दंड आकारून त्याचे कंत्राट कायमचे रद्द केले होते. वारंवार घडणा-या या घटनांमुळे प्रवाशांच्या आरोग्याशी खेळणा-या कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR