नवी दिल्ली : कतारमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आठ माजी भारतीय नौसैनिकांना गुरुवारी (२८ डिसेंबर) मोठा दिलासा मिळाला. भारत सरकारच्या अपिलावर आठही जणांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. मंत्रालयाने सांगितले की, त्यांनी या प्रकरणाबाबत कतारमधील न्यायालयाशी संपर्क साधला आहे. सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्यांची शिक्षा कमी केली.
परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, तपशीलवार निर्णयाची प्रत प्रतीक्षेत आहे. आमची कायदेशीर टीम आठ भारतीयांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात पुढील पावले उचलत आहे. सुनावणीवेळी राजदूत आणि अधिकारी न्यायालयात उपस्थित होते. मंत्रालयाने पुढे सांगितले की, आम्ही सुरुवातीपासून आठ लोकांच्या कुटुंबासोबत उभे आहोत. या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेता आपण त्याबद्दल फार बोलणे योग्य ठरणार नाही. आम्ही हे प्रकरण कतार प्रशासनाकडे सातत्याने मांडत आलो आहोत आणि यापुढेही मांडू, असे मंत्रालयाने म्हटले आहे.