26.6 C
Latur
Friday, November 7, 2025
Homeमहाराष्ट्रबच्चू कडू यांना कार्यालयासाठी जागा देण्याचा निर्णय रद्द

बच्चू कडू यांना कार्यालयासाठी जागा देण्याचा निर्णय रद्द

शिंदेंचा आणखी एक निर्णय फडणवीसांनी बदलला

मुंबई : प्रतिनिधी
एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात घेतलेले निर्णय बदलण्याचा सपाटाच विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लावला आहे. गेल्या दहा महिन्यांमध्ये अनेक निर्णय बदलले गेले, शिंदेंनी सुरू केलेल्या योजना बंद केल्या. त्यात आणखी एका निर्णयाची भर पडली आहे. मुख्यमंत्री असताना शिंदे यांनी बच्चू कडू यांच्या प्रहार या पक्षासाठी मंत्रालयाजवळ जागा दिली होती. तो निर्णय फडणवीसांनी रद्द केला आहे.

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केले तेव्हा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी त्यावेळी एकनाथ शिंदे यांना साथ दिली होती. बच्चू कडू यांना दिव्यांग कल्याण विभागाच्या एका महामंडळाचे अध्यक्षपदही देण्यात आले होते. त्याचबरोबर बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षासाठी मंत्रालयासमोर जागा देण्यात आली होती.

जनता दल सेक्यूलर (जेडीएस) पक्षाच्या कार्यालयाची जागा कमी करुन तिथेच प्रहार जनशक्ती पक्षासाठी जागा दिली होती. मंत्रालयाशेजारी जनता दलाचे ९०० चौरस फुटाचे कार्यालय आहे. त्यातील ७०० चौरस फुट जागा तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्ष कार्यालयासाठी दिली होती. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचा हा निर्णय बदलला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाची जागा काढून घेतली आहे. जेडीएसला पूर्वीप्रमाणेच संपूर्ण जागा देण्याचा निर्णय फडणवीसांनी घेतला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR