बालाघाट : मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात संसर्गजन्य आजारांमुळे आदिवासी मुलांच्या झालेल्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर पीडित कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेलेल्या कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्स असल्याचे भासणा-या एका गटाने घेरले.
आदिवासी बालकांच्या मृत्यूवर राजकारण करायला आला का?, असा सवाल त्यांनी दीपकेंना केला. उशिरा या भागात का आला, अशी विचारणाही एका महिलेने दीपके यांना केली. शनिवारी घडलेल्या प्रकाराचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यात भागाला भेट देण्यास विलंब झाल्याबद्दल दीपके माफी मागताना दिसत आहेत. दीपके यांनी शनिवारी अडोरी, कोरका आणि बोंदारी या गावांना भेट दिली. या पीडित कुटुंबीयांची भेट आणि स्थानिक आरोग्य सुविधांची माहिती घेणे, हा त्यांच्या दौ-याचा उद्देश होता.
जाताना विचारला जाब
व्हायरल व्हीडीओत दीपके गाडीतून निघत असताना एक महिला त्यांच्या समोर माईक धरताना दिसत आहे. या भागात चांगला रस्ता तयार केला आहे, तो दिसत नाही का, असा सवालही तिने दीपके यांना केला. या प्रकारानंतर कार्यकर्त्यांनी दीपके यांना दुस-या गाडीत बसवून तेथून नेले. ते निघून गेल्यानंतर संबंधित महिला ‘ते पळून गेले…’ असे म्हणताना ऐकू येते.
३० हून अधिक मृत्यू
बालाघाट परिसरात ३० हून अधिक मुलांच्या मृत्यूप्रकरणी दाखल एका जनहित याचिकेची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने नुकतीच दखल घेतली आहे. राज्य सरकारसह आरोग्य विभाग, महिला व बाल विकास विभाग, जिल्हाधिकारी आणि इतर संबंधितांना न्यायालयाने नोटिसा बजावल्या आहेत.
















