देगलूर (प्रतिनिधी): तालुक्यातील खुतमापूर येथे उष्माघाताची एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. वाढत्या तापमानामुळे आणि उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे एका भूमिहीन शेतकऱ्याच्या तब्बल २० शेळ्यांचा तडफडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री घडली असून, यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
संसाराचा एकमेव आधार हरपला
खुतमापूर येथील रहिवासी सोपान तुकाराम टोके हे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शेळीपालन करून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकत होते. कोणतीही हक्काची जमीन नसताना केवळ या शेळ्यांच्या व्यवसायातूनच त्यांनी मुलाबाळांचे शिक्षण, कुटुंबाचा दैनंदिन खर्च आणि आपल्या वृद्धापकाळाचा आधार उभा केला होता. मात्र, २१ मे रोजी आलेल्या तीव्र उष्माघाताने त्यांच्या या सुखी संसारावर घाला घातला. वाढत्या तापमानाचा फटका बसून एकामागून एक अशा २० शेळ्यांचा जागेवरच तडफडून मृत्यू झाला.
५ लाखांचे नुकसान; उपासमारीची टांगती तलवार
या अनपेक्षित नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी सोपान टोके यांचे अंदाजे ५ लाख रुपयांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ऐन उन्हाळ्यात संपूर्ण उदरनिर्वाहाचे साधनच नष्ट झाल्यामुळे टोके कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. कुटुंबाचा मुख्य आधारच हिरावला गेल्याने आता त्यांच्यावर उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शासनाकडे तातडीच्या मदतीची मागणी
टोके कुटुंबाची एकूण परिस्थिती पाहता, शासनाने या घटनेची गंभीर दखल घ्यावी. प्रशासनाने तातडीने नुकसानीचा पंचनामा करून या भूमिहीन शेतकऱ्याला तात्काळ आर्थिक मदत मंजूर करावी, अशी आग्रही मागणी आता स्थानिक नागरिकांमधून आणि ग्रामस्थांमधून केली जात आहे.
















