नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीची हवा अतिधोकादायक पातळीवर गेली आहे. बुधवारी (२० नोव्हेंबर) दुपारी चार वाजता दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक ४३८ वर गेला होता. दिल्लीची गणना जगातील सर्वांधिक प्रदूषित शहर म्हणून होत आहे. जगातील पहिल्या दहा प्रदूषित शहरांमध्येही देशातील आठ शहरांचा समावेश होता.
राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारी ४ च्या आकडेवारीनुसार दिल्ली जगातील सर्वांधिक प्रदूषित शहर होते. दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक ४ वाजता ४३२ वर गेला होता. हवेत २.५ मायक्रॉनच्या प्रदूषकांचे प्रमाण २९१ तर १० मायक्रॉनच्या प्रदूषकांचे प्रमाण ४१३, कार्बन मोनोऑक्साईडचे प्रमाण १२२९ पीपीबी, सल्फर डायऑक्साईचे प्रमाण ५ पीपीबी, नायट्रोजन ऑक्साईडचे प्रमाण २८ पीपीबी, ओझोन १० पीपीबी होते.
दुस-या क्रमांकावर उत्तर प्रदेशातील हापूर (हापूड) असून, हवा गुणवत्ता निर्देशांक ४२२ इतका होता. हवेत २.५ मायक्रॉनच्या प्रदूषकांचे प्रमाण २६३ तर १० मायक्रॉनच्या प्रदूषकांचे प्रमाण ४४७, कार्बन मोनोऑक्साईडचे प्रमाण १५५३ पीपीबी, सल्फर डायऑक्साईचे प्रमाण ८ पीपीबी, नायट्रोजन ऑक्साईडचे प्रमाण १२ पीपीबी, ओझोन १४ पीपीबी होते. तिस-या क्रमांकावर चीनच्या हेलॉन्गजियांग प्रातांतील दकिंग शहर असून, वायू गुणवत्ता निर्देशांक ४०१ आहे.
हवेत २.५ मायक्रॉनच्या प्रदूषकांचे प्रमाण २५२ तर १० मायक्रॉनच्या प्रदूषकांचे प्रमाण ३३०, कार्बन मोनोऑक्साईडचे प्रमाण १३१६ पीपीबी, सल्फर डायऑक्साईचे प्रमाण ६ पीपीबी, नायट्रोजन ऑक्साईडचे प्रमाण ३५ पीपीबी, ओझोन ८ पीपीबी होते. हवा निर्देशांकानुसार ० ते ५० हवा निर्देशांक असेल तर चांगली हवा, ५० ते १०० निर्देशांक असेल तर समाधानकारक, १०० ते २०० निर्देशांक असेल तर मध्यम, २०० ते ३०० निर्देशांक असेल तर वाईट, ३०० ते ४०० निर्देशांक असेल तर अत्यंत वाईट, ४०० पेक्षा जास्त निर्देशांक असेल तर हवा अति धोकादायक मानली जाते.
उत्तर भारतातील शहरे प्रदूषित
जगातील पहिल्या दहा सर्वांधिक प्रदूषित शहरांमध्ये भारतातील आठ शहरांचा समावेश आहे. दिल्ली पाठोपाठ उत्तर भारतातील अनेक शहरांतील हवेची गुणवत्ता वाईट किंवा अति धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार प्रदूषित शहरे (कंसात हवा गुणवत्ता निर्देशांक) नवी दिल्ली-४३८, हापूर (उत्तर प्रदेश)-४३०, भिवानी (हरियाणा)-४०४, दकिंग (चीन)-३९८, गुरुग्राम (हरियाणा) ३८३, गाझियाबाद (उत्तर प्रदेश)-३६५, सोनीपत (हरियाणा)-३५१, मेरठ (उत्तर प्रदेश)-३५१, अद दिरियाह (सौदी अरेबिया)-३४४, नोएडा (उत्तर प्रदेश)-३४१.
थंडी, दाट धुक्यामुळे हवा बिघडली
दिल्लीसह उत्तर भारतात थंडी आणि दाट धुके पडत आहे. थंडी, दाट धुके आणि वा-याचा प्रवाह मंद असल्याने हवेत धुळीचे, धुराचे कण साचून राहतात. हवेची घनता जास्त असल्याने १० मायक्रॉनच्या वरील प्रदूषित कणही जमिनीवर लवकर पडत नाहीत. घनता वाढलेल्या हवेत धूर, धुळीचे कण, वाहनांच्या धुरातून बाहेर पडणारे लहान कण साचून राहतात. वा-याचा प्रवाह मंद असल्याने प्रामुख्याने शहरांवर प्रदूषित हवा जास्त काळ टिकून राहते. त्यामुळे उत्तर भारतातील शहरांचा हवा गुणवत्ता निर्देशांक बिघडला आहे.

