सोलापूर (प्रतिनिधी) : मागासवर्गीय आयोगातर्फे सध्या राज्यात मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण सुरू आहे. मात्र या सर्वेक्षणाचा अर्जामध्ये ब्राह्मण समाजाचे विविध विभाग दाखविण्यात आले आहेत. त्यामुळे ब्राह्मण समाजात गैरसमज निर्माण झाला आहे. हा संभ्रम दूर होण्यासाठी या सर्वेक्षणाच्या अर्जामध्ये ‘ब्राह्मण’ हा शब्द समाविष्ट करावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी निवेदन स्वीकारले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी कांबळे यांनी सर्वेक्षणामध्ये येणाऱ्या अडचणीच्या संदर्भात आपण संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबत माहिती कळवू असे आश्वासन दिले. सध्या सुरू असलेल्या सर्वेक्षणाच्या अर्जामध्ये ब्राह्मण समाजातील पर्याय म्हणून दैवज्ञ ब्राह्मण, लाड ब्राह्मण, विश्व ब्राह्मण, भिक्षुकी ब्राह्मण, जोशी ब्राह्मण असे पर्याय दिले आहेत. मात्र यापैकी पहिल्या तीन जाती या ब्राह्मण समाजात येत नसून त्या इतर मागासवर्ग म्हणून ग्रा धरल्या जातात. इतर दोन पर्याय हे सर्व ब्राह्मणांचे प्रतिनिधित्व करीत नसून संभ्रम निर्माण करणारे आहेत.
सोलापूर मध्ये इतर ब्राह्मण पोट जाती नमूद नसल्या तरी महाराष्ट्रीयन ब्राह्मण, राजस्थानी ब्राह्मण, कर्नाटकी ब्राह्मण, उत्तर प्रदेश ब्राह्मण, अशी ब्राह्मण मंडळी सोलापूर मध्ये वास्तव्यास आहेत. तेव्हा सर्व ब्राह्मणांसाठी म्हणून ‘ब्राह्मण’ हा एकच पर्याय त्यात समाविष्ट करावा अशी आमची मागणी आहे. तसेच हा अर्ज साधा, सोपा आणि संभ्रमित करणारा नसावा व ज्या जाती इतर मागासवर्ग मध्ये मोडतात त्यांचा उल्लेख या अर्जातून रद्द करून मिळावा ही विनंती. याशिवाय ज्या कुटुंबाचे सर्वेक्षण केले जाईल त्या कुटुंबाला आपले सर्वेक्षण झाले आहे याची पोच पावती देण्याची व्यवस्था करता येईल का तेही पहावे. यामुळे सरकारकडेही सर्वेक्षण झाल्याची नोंद होईल आणि कुटुंबाकडेही सर्वेक्षण झाल्याचा पुरावा राहील. आपण आमच्या मागण्यांचा निश्चितच विचार कराल ही अपेक्षा.
यावेळी समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने पंचांगकर्ते मोहनराव दाते, राम तडवळकर, दत्ता आराध्ये, श्रीकांत कुलकर्णी, सुहास देशपांडे, नागेश जोशी, गोविंद गवई, दत्तराज कुलकर्णी, किरण करमरकर, बजरंग कुलकर्णी, अमृता गोसावी, संपदा जोशी आदी उपस्थित होते.