उत्तरकाशी : उत्तरांखड राज्यातील उत्तरकाशी येथे मंगळवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली असून येथे भारतीय लष्कराच्या तळापासून साधारण ४ किमी दूर असणा-या धराली गावात ढगफुटी झाली आहे. या ढगफुटीमुळे धराली गावात मोठा विध्वंस झाला आहे. ढगफुटी झाल्यानंतर त्या भागात मोठा पूर आला असून तब्बल ५ लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या दुर्घटनेत १०० पेक्षा जास्त लोक गायब झाले आहेत.
या दुर्घटनेचे अनेक व्हीडीओ समोर आले आहेत. दुर्घटनेची माहिती होताच या भागात युद्धपातळीवर बचावकार्य चालू आहे. या ढगफुटीमुळे पवित्र गंगोत्री धामचा रस्तादेखील वाहून गेला आहे. अचानक आलेल्या ढगफुटीमुळे चिखल आणि पाण्याचा फार मोठा पूर आला आहे. या पुरात धराली परिसर जलमय झाला आहे. ही दुर्घटना घडताच आपत्कालीन मदत पाठवण्यात आली असून तिथे युद्धपातळीवर बचावकार्य केले जात आहे.
माहिती आगामी काळात देऊ : जिल्हाधिकारी
उत्तरकाशीचे जिल्हाधिकारी प्रशांत आर्य यांनी सांगितले की या दुर्घटनेत आतापर्यंत ५ लोकांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. या दुर्घटनेत आणखी किती लोकांचा मृत्यू झाला तसेच वित्तहानी किती झाली? हे आगामी काळात समजेल, असे प्रशांत आर्य यांनी सांगितले. दुसरीकडे ही दुर्घटना होताच मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी धरालीतील दुर्घटनेनंतर दु:ख व्यक्त केले. एसडीआरएफ, एनडीआरएफ तसेच जिल्हा प्रशासन बचावकार्य करत आहेत. मी वरिष्ठ अधिका-यांच्या संपर्कात आहे असे पुष्कर सिंह धामी यांनी सांगितले.
एका क्षणात घर, हॉटेल गेले वाहून
धराली गाव गंगोत्र धामच्या साधारण २० किमी अलिकडे आहे. भाविकांना थांबण्यासाठी हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. ही घटना घडल्यानंतर प्रत्यक्षदर्शी राजेश पवार यांनी सविस्तर माहिती दिली आहे. खीर गंगाच्या परिसरात ढगफुटी झाली आहे. त्यामुळे नदीत विध्वसंक पूर आला. या पुरात पाणी आणि चिखल मोठ्या प्रमाणात होता. यात अनेक घरं, हॉटेल वाहून गेले. विशेष म्हणजे हा पूर आल्याचे पाहून लोक सैरावेरा पळत सुटले होते. यात काही लोक वाहून गेले.

