26.3 C
Latur
Friday, July 18, 2025
Homeमहाराष्ट्रधनंजय मुंडेंचे दलाल गँगमुळे नुकसान

धनंजय मुंडेंचे दलाल गँगमुळे नुकसान

कराडचे नाव घे करुणा शर्मांचा आरोप फरार कृष्णा आंधळेची हत्या झाल्याचा संशय

मुंबई : सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे हे त्यांच्या मागे असणा-या दलाल गँगमुळे अडचणीत सापडल्याचा दावा त्यांच्या पत्नी करुणा शर्मा मुंडे यांनी केला आहे. धनंजय मुंडे यांना मी २७ वर्षांपासून ओळखते. त्यांना पैशांची गरज नाही. पण दलाल गँगमुळे त्यांचे नुकसान झाले आहे.

धनंजय मुंडे व करुणा मुंडे यांच्यातील न्यायालयीन प्रकरणावर गुरूवारी कोर्टात सुनावणी झाली. त्यात कोर्टाने धनंजय यांना करुणा मुंडे यांना देण्यात येणा-या पोटगीची ५० टक्के रक्कम भरण्याचे आदेश दिले. करुणा यांनी शुक्रवारी ही माहिती देताना मुंडेंवर निशाणा साधला. तसेच ते चुकीच्या लोकांच्या संपर्कात असल्याचाही दावा केला. त्या म्हणाल्या, धनंजय मुंडे यांना मला पैसे द्यायचे नाहीत. त्यामुळे ते कोर्टात गेले. माझ्याकडे ५० कोटींची प्रॉपर्टी होती. त्यांनी ती मला विकायला लावली. निवडणुकीत मी माझे मंगळसूत्र विकून त्यांना पैसे दिले होते.

पण आता कोर्टाने त्यांना पोटगीची ५० टक्के रक्कम देण्याचे निर्देश दिलेत. पोटगी ३५ ते ४० लाख रुपयांच्या आसपास आहे. त्यातील निम्मी रक्कम त्यांना कोर्टात भरावी लागेल. कोर्टाने माझ्या मुलीची १०० टक्के रक्कम भरण्याचेही आदेश दिले आहेत. धनंजय मुंडे माझ्यासोबत ६ वर्षे याच घरात होते. तोपर्यंत ते कांदा-लसूणही खात नव्हते. पण त्यानंतर काही दलाल त्यांच्या संपर्कात आले. त्यानंतर आमच्यात फूट पडली. त्यांनी विचार केला पाहिजे. पण त्यांचे डोके कुठे गेले काय माहिती. मी त्यांना २७ वर्षांपासून ओळखते. त्यांना पैशांची गरज नाही. दलाल गँगमुळे ते चुकीचे वागत आहेत. वाल्मीक कराड व तेजस ठक्कर यांच्यामु्ळे ते अडचणीत सापडलेत. या माणसांमुळेच ते चुकीचे पाऊल टाकत आहेत असेही करुणा शर्मा यावेळी म्हणाल्या.

धनंजय यांनी दलालांचे ऐकू नये
करुणा शर्मा यांनी यावेळी धनंजय मुंडे यांना दलाल लोकांचे न ऐकण्याचेही आवाहन केले. धनंजय मुंडे यांनी दलालांचे ऐकू नये असे मी आवाहन करते. मी प्रेमिका म्हणून त्यांच्यासोबत राहत होते. मी कोर्टात गेले नव्हते. तेच कोर्टात गेले. मला त्यांच्या प्रॉपर्टीचीही माहिती नव्हती. त्यांनी निवडणुकीसाठी माझ्याकडून घेतलेले पैसे परत करावेत, असे त्या म्हणाल्या.

कृष्णा आंधळेची हत्या झाल्याचा संशय
करुणा यांनी यावेळी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याची हत्या झाल्याचाही संशय व्यक्त केला. कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांना सापडला नाही. त्यामुळे त्याचा खून झाल्याची शक्यता आहे. या प्रकरणी वाल्मीक कराडला येरवड्याच्या तुरुंगात पाठवण्यासाठी माझे कार्यकर्ते सातत्याने अजित पवारांना निवेदन देत आहेत. पण त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही असे त्या म्हणाल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR