पुणे : अजित पवार गटाचे नेते व राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नीच्या गाडीचा अपघात झाला. त्यांची गाडी आणि ट्रॅव्हल बस यांची भीषण धडक झाली. पुणे-सोलापूर महामार्गावर पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे या किरकोळ जखमी झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या कारचा पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाला. पुणे-सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी येथे पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. राजश्री मुंडे यांच्या कार आणि ट्रॅव्हल बसमध्ये जोरदार धडक झाली. मुंडे यांच्या कारने ट्रॅव्हल्सला पाठीमागून धडक दिली. यामध्ये मुंडेंच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. गाडीचा पुढचा भाग पूर्णपणे खराब झाला आहे.
दोन्ही वाहने वेगाने धावत असल्यामुळे ही धडक झाली. घटनेची माहिती मिळताच तातडीने स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. यामध्ये राजश्री मुंडे किरकोळ जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. अपघातानंतर त्यांची प्रकृती तपासून त्यांना काही वेळातच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.