मुंबई : शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्तव्यवस्था व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती स्थापन होईपर्यंत देवस्थानाचा कारभार सुरळित चालावा यासाठी देवस्थान व्यवस्थापनावर अहिल्यानगर जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारच्या विधि व न्याय विभागाने याबाबतचा जीआर काढला आहे.
शनिशिंगणापूर येथील विश्वस्त मंडळाच्या गैरकारभाराचे अनेक नमुने गेल्या काळात बाहेर आले होते. खुद्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ अधिवेशन काळात विधानसभेतच या घोटाळयांची यादी वाचून दाखवत यातील दोषींना आपण सोडणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते. त्यानुसारच आता राज्य सरकारने पावले टाकली आहेत.
वादांची मोठी यादी
बनावट अॅप घोटाळा, आर्थिक गैरव्यवहार व अनियमितता,देवस्थानमधील हिंदू व मुस्लिम कर्मचा-यांमध्ये निर्माण झालेली वैमनस्याची परिस्थिती, श्री शनिचौथ-याचा वाद, देवस्थानचे उप कार्यकारी अधिकारी यांनी केलेली आत्महत्या यामुळे ही विश्वस्त व्यवस्था कठोर टिकेची धनी झाली होती. या देवस्थानला भेट देण्यासाठी लाखो भाविक येत असतात, त्यांच्या श्रद्धेचाही प्रश्न होता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी प्रशासक
श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्तव्यवस्था अधिनियम २०१८ हा अधिनियम २२ सप्टेंबर २०२५ पासून अंमलात आणण्यात आला आहे. या अधिनियमात विश्वस्तव्यवस्था व्यवस्थापन समिती स्थापन करण्याची तरतूद आहे. तोपर्यंत देवस्थानचा कारभार सुरळित चालावा यासाठी देवस्थान व्यवस्थापनावर अहिल्यानगर जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
















