इस्लामाबाद : दुस-याचे घर जाळू पाहणा-या व्यक्तीचे घर त्याच आगीत जळून खाक व्हावे, अशी दयनीय अवस्था सध्या पाकिस्तानची झाली आहे. दहशतवाद्यांना थारा देऊन भारताविरोधात नेहमीच कुरापती करणारा हा देश त्याच दहशतवादाच्या पडछायेत सापडला आहे. पाकिस्तानला सध्या त्यांच्याच देशातील बलुचिस्तानमधील दहशतवादी हल्ल्यांचा सामना करावा लागत आहे. या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांनी लष्कर तैनात केले आहे. तरीदेखील बंडखोरांकडून एकापाठोपाठ एक हल्ल्यांचा सपाटा सुरूच आहे. या परिस्थितीवर भाष्य करताना पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. त्यांच्या विधानामुळे पाकिस्तानी लष्कराच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
बलुचिस्तान हा पाकिस्तानचा क्षेत्रफळाने सर्वांत मोठा असा प्रांत आहे आणि याच भौगोलिक रचनेचा गैरफायदा बंडखोरांना मिळत असल्याचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी सांगितले. त्यांनी हे विधान बलुच लिबरेशन आर्मीने दक्षिण-पश्चिम बलुचिस्तानमध्ये एकाच वेळी केलेल्या आत्मघाती हल्ल्यानंतरच्या काही दिवसांतच केले. या हल्ल्यांमध्ये सुरक्षा कर्मचा-यांसह अनेक नागरिकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर राबवण्यात आलेल्या दहशतवादविरोधी कारवायांमध्ये बलुचिस्तानमध्ये १९७ दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी केला. मात्र, इतक्या मोठ्या संख्येने बंडखोरांचे निर्दालन करूनही संरक्षणमंर्त्यांनी हतबलता व्यक्त केल्याने पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षेची अनेकांनी खिल्ली उडवली.
काय म्हणाले पाकचे संरक्षणमंत्री?
संसदेला संबोधित करताना पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की, एखाद्या गजबजलेल्या शहराच्या किंवा परिसराच्या तुलनेत बलुचिस्तानमधील परिस्थिती हाताळणे अत्यंत कठीण आहे. तिथे मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात करण्याची गरज आहे. आमच्या सुरक्षा दलांचे जवान तिथे कार्यरत असून बंडखोरांवर कारवाई केली जात आहे; परंतु इतक्या मोठ्या क्षेत्रावर नजर ठेवण्यास आणि गस्त घालण्यात लष्कराला अडचणी येत आहेत. आसिफ यांनी निदर्शनास आणून दिले की, बलुचिस्तान हा पाकिस्तानचा क्षेत्रफळाने सर्वांत मोठा प्रांत असून तिथे प्रत्येक ३५ किलोमीटरवर केवळ एक व्यक्ती वास्तव्यास आहे.

