मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्या, मंगळवारी वाढदिवस असून या निमित्ताने जाहिराती, होर्डिंग, बॅनर न लावता मुख्यमंत्री सहायता निधीस योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपल्या सूचनांचे पालन न केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
आपल्यासाठी वाढदिवस हा खास नसतो इतर दिवसांसारखाच असतो. माझ्या वाढदिवशी बॅनर, पोस्टर न लावता मुख्यमंत्री सहायता निधीस हातभार लावण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे. गरीब, गरजू रूग्णांना त्यामुळे उपचारांसाठी मदत मिळणार आहे. त्याला चांगला प्रतिसादही लाभतो आहे. वाढदिवशी आपले गडचिरोलीला जाण्याचे प्रयोजन असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण राज्यात मंगळवार २२ जुलै रोजी ‘महारक्तदान शिबीर’ आयोजित करण्याचा संकल्प भाजपने केला आहे. भाजप प्रदेश कार्यालय, नरिमन पॉईंट येथे सकाळी ११ वाजल्यापासून ‘महारक्तदान शिबीर’ आयोजन करण्यात आले आहे. राज्यात विविध ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते, सर्वसामान्य रक्तदाते या दिवशी रक्तदान करणार आहेत.
















