Homeअंतरराष्ट्रीयडोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन यांच्यात ९० मिनिटांची 'मॅरेथॉन' चर्चा; इराणमधील युद्धविरामासह अनेक जागतिक मुद्द्यांवर...

डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन यांच्यात ९० मिनिटांची ‘मॅरेथॉन’ चर्चा; इराणमधील युद्धविरामासह अनेक जागतिक मुद्द्यांवर खलबतं

वॉशिंग्टन/मॉस्को:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात बुधवारी सुमारे ९० मिनिटे फोनवरून सविस्तर चर्चा झाली. या ‘मॅरेथॉन’ चर्चेत प्रामुख्याने इराणमधील युद्धविराम (Ceasefire) आणि रशिया-युक्रेन युद्धावर तोडगा काढण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. मार्च महिन्यानंतर दोन्ही नेत्यांमधील हा पहिलाच मोठा संवाद आहे.

क्रेमलिनचे सल्लागार युरी उशाकोव्ह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुतिन यांनी इराणसोबतचा युद्धविराम वाढवण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. इराणचा अणू कार्यक्रम आणि युरेनियम समृद्धीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुतिन यांनी काही प्रस्तावही मांडले असून, रशिया या प्रक्रियेत मदत करण्यास तयार असल्याचे सांगितले आहे.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “आमची चर्चा अतिशय सकारात्मक झाली. मी पुतिन यांना युक्रेनमध्ये काही काळासाठी युद्धविराम लागू करण्याची सूचना केली आहे आणि मला वाटते की ते यावर सकारात्मक विचार करतील.”

रशियामध्ये ९ मे रोजी साजरा होणाऱ्या ‘विजय दिना’च्या (Victory Day) पार्श्वभूमीवर पुतिन यांनी युक्रेनमध्ये तात्पुरत्या युद्धविरामाचा प्रस्ताव ठेवला आहे. हा शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरू शकते, असे मानले जात आहे. ओव्हल ऑफिसमध्ये अंतराळवीरांच्या भेटीदरम्यान ट्रम्प म्हणाले की, “पुतिन यांना मी बऱ्याच काळापासून ओळखतो. त्यांनाही युक्रेन युद्ध संपवण्यात रस आहे. इराणच्या मुद्द्यावरही त्यांनी मदतीची तयारी दर्शवली आहे, पण मी त्यांना स्पष्ट सांगितले की, त्याआधी मला युक्रेनमधील युद्ध संपवायचे आहे.”

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR