17.7 C
Latur
Tuesday, December 2, 2025
Homeअंतरराष्ट्रीयडोनाल्ड ट्रम्प यांची मादुरो यांना फोनवर थेट धमकी

डोनाल्ड ट्रम्प यांची मादुरो यांना फोनवर थेट धमकी

ताबडतोब देश सोडा अमेरिका-व्हेनेझुएला युद्ध पेटणार?

वॉशिंग्टन : व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील तणाव प्रचंड वाढला आहे. रविवारी अर्थात ३० नोव्हेंबरला ट्रम्प यांनी मादुरो यांच्याशी फोनवर चर्चा केल्याचे मान्य केले होते. मात्र, या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली, यासंदर्भातील माहिती समोर आली नव्हती.

डोनाल्ड ट्रम्प यांनी फोनवरून निकोलस मादुरो यांना थेट धमकी दिली आहे. जर तुम्हाला स्वत:ला आणि तुमच्या कुटुंबीयांना वाचवायचे असेल, तर ताबडतोब देश सोडा. ट्रम्प यांनी मादुरो, यांची पत्नी सिलिया फ्लोरेस आणि मुलाला सुरक्षितपणे देशाबाहेर पडण्याची ऑफर दिली आहे. यासाठी ‘ताबडतोब देश सोडण्याची’ अट ठेवण्यात आली आहे. मात्र, व्हेनेझुएलाने ही अटी मान्य करण्यास नकार दिला आणि चर्चा निष्फळ ठरली.

व्हेनेझुएला मार्गे अमेरिकेत होणा-या ड्रग्जच्या तस्करीसंदर्भात अमेरिकेने कठोर भूमिका घेतली आहे. अलीकडेच ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाची हवाई हद्द बंद करण्याची घोषणा केली. ट्रम्प यांनी ट्रथ सोशलवर लिहिले होते सर्व एअरलाइन्स, पायलट, ड्रग्ज डिलर्स आणि मानवी तस्करांना विनंती आहे की त्यांनी व्हेनेझुएलावरील आणि त्याच्या जवळपासचे हवाई क्षेत्र पूर्णपणे बंद मानावे. यावर, मादुरो सरकारने या निर्णयावर आंतरराष्ट्रीय मानकांचे उल्लंघन आणि एका स्वतंत्र राष्ट्राच्या सार्वभौमत्वासाठी थेट धमकी असल्याचे म्हटले आहे. खरे तर, व्हेनेझुएलाची हवाई हद्द बंदच्या घोषणेमुळे, अमेरिका व्हेनेझुएलावर हल्ला करण्याच्या तयारीत तर नाही ना?, अशा चर्चांना उधाण आले आहे. या चर्चांसंदर्बात, अमेरिकेकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अथवा भाष्य करण्यात आलेले नाही.

कॅरिबियनमध्ये अमेरिकेचे हल्ले सुरूच
तत्पूर्वी, कॅरिबियनमध्ये कथित ड्रग्ज बोटींविरुद्ध अमेरिकेचे हल्ले गेल्या काही महिन्यांपासून सुरूच आहेत. या शिवाय या भागात अमेरिकेची सैन्यतैनातही वाढली आहे. ट्रम्प यांनी व्हेनेझुएलामध्ये गुप्त सीआयए मोहिमांना अधिकृतता दिली आहे. या आठवड्यात त्यांनी सैन्यदलाच्या सदस्यांना सांगितले होते की, व्हेनेझुएलातील संशयित ड्रग्ज तस्करांना रोखण्यासाठी अमेरिका लवकरच जमिनी स्तरावर मोहीम सुरू करेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR