मुंबई (प्रतिनिधी) : हिंदी भाषेची द्वेष करणे हे विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही. फक्त प्राथमिक शिक्षणात हिंदी सक्ती नसायला हवी असा सगळ्यांचा आग्रह आहे. इयत्ता पाचवीनंतर हिंदी शिकवायला काही हरकत नाही. पण, लहान मुलांच्या एका विशिष्ट वयामध्ये किती भाषा ते आत्मसात करू शकतात. त्यांच्यावर किती भाषांचा भार टाकावा याचा देखील विचार करावा लागेल. दुर्सया भाषेचा भार टाकला आणि मातृभाषा बाजूला पडली तर हे योग्य नाही. म्हणून पाचवी पर्यंतचा हिंदी भाषेचा हट्ट सरकारने सोडावा’’, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केले.
हिंदी सक्तीविरोधात रान पेटलेले असताना शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. देशातील जवळपास ५५ ते ६० टक्के लोक हिंदी बोलतात. त्यामुळे सुसंवाद ठेवण्यासाठी या भाषेकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. पण त्यामुळे सक्ती करणं हे योग्य नाही. उद्धव आणि राज ठाकरे यांची भूमिका चुकीची नाही. कोणत्या स्तरावर हिंदी हवी आणि नको या दोन्ही गोष्टी सांगितल्या आहेत. मराठी भाषेवरुन एकत्र येण्यासाठी ते भूमिका घेत असतील तर मातृभाषेच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट आहे. ५ जुलैच्या मोर्चाबद्दल मला अजून कुणी सांगितलेले नाही. हिंदी सक्तीचा विषय कुणी एक पक्ष हाती घेऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही इतर राजकीय पक्षांसोबत बोलणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.