नवी दिल्ली : कॉकरोच जनता पार्टीने शनिवारी आयोजित केलेल्या आंदोलनाबाबत सरकारने अवलंबलेल्या कठोर भूमिकेवरून सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारले. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी टिप्पणी केली की, तुम्हाला काही गोष्टी नक्कीच थांबवाव्या लागतील. त्या रोखण्यासाठी केवळ आवश्यक तितकीच कारवाई करा. मात्र, याचा अर्थ असा नाही की माशी मारण्यासाठी तुम्ही हातोड्याचा वापर कराल. हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. यावरून आता माशी या शब्दावरून नव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सीजेपीच्या उद्या होणा-या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, आज रात्री ९ वाजल्यापासून ५७ मेट्रो स्थानके बंद राहतील. दरम्यान, नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन स्थानकांकडे जाणा-या सर्व मेल आणि एक्सप्रेस गाड्या उद्या रद्द करण्यात आल्या आहेत; रेल्वेने या गाड्या त्यांच्या मूळ स्थानकांवरूनच रद्द केल्या आहेत. १० ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीने प्रस्तावित केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. पानिपत ते दिल्ली या मार्गावरील रेल्वे स्थानकाबाहेर तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. टिकरी, बदरपूर, कापसेहरा आणि सिंघू सीमांवर वाहनांची तपासणी केल्यानंतरच त्यांना पुढे जाण्याची परवानगी दिली जात आहे. आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीला जात असताना, पानिपतचे काँग्रेसचे माजी आमदार बलबीर वाल्मिकी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
ऑनलाइन वर्ग घेणार
जंतरमंतर येथे नियोजित आंदोलन आणि मेट्रो सेवा स्थगित करण्यात आल्यामुळे, दिल्लीतील अनेक शाळा आणि महाविद्यालयांनी १० ऑक्टोबरसाठी आपले वर्ग ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. पालकांशी संवाद साधण्याच्या बैठकीच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत आणि परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
















