23.2 C
Latur
Sunday, December 8, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यावर थंडी, पावसाचे दुहेरी संकट!

राज्यावर थंडी, पावसाचे दुहेरी संकट!

पुणे : प्रतिनिधी
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असणा-या हवामान बदलांमध्ये आता गुलाबी थंडीचाही समावेश झाला आहे. राज्यातील काही भागात पावसाने दडी मारली असली तरी, वातावरणातील सततच्या बदलांमुळेच पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. दक्षिण महाराष्ट्रावर अजूनही पावसाचे सावट असल्याचे पाहायला मिळत आहे. उर्वरित राज्यात मात्र थंडीची चाहूल लागल्याचे स्पष्ट होत आहे.

तर पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या उत्तरेकडील भागात पहाटेच्या वेळी कडाक्याची थंडी पडू लागली आहे. घाटमाथ्यावरील भागांमध्ये पहाटेच्या वेळी दाट धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. तर उत्तर महाराष्ट्रात पारा चांगलाच उतरताना दिसत आहे. राज्यातील सर्वांत कमी तापमानाची नोंद निफाडमध्ये झाली असून, येथील तापमान १२ अंशांवर पोहोचले आहे.

तर दुसरीकडे पश्चिम बंगाल आणि चेन्नईकडे सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे चक्रीवादळासारखी स्थिती निर्माण झाली आहे. परिणाम पुढचे तीन दिवस अलर्ट देण्यात आला आहे. त्याचा परिणाम किनारपट्टीलगतच्या भागामध्ये दिसत आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान विभागाने पावसाचा अलर्ट दिला आहे. वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

तसेच १४ आणि १५ नोव्हेंबर रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे. तर त्यानंतर तापमानात आणखी घट होण्याची शक्यताही व्यक्त केली आहे. मुंबई, उपनगर, ठाणे, नवी मुंबईतही गारवा जाणवत आहे. येत्या २ दिवसांत तापमान आणखी खालावण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातही रात्री उशिरा तापमानात घट होत आहे. त्यामुळे गारठा वाढला आहे. तसेच पुणे, कोल्हापूर, सातारा आणि घाटमाथ्यावर १४, १५ नोव्हेंबर रोजी वादळी वा-यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

लातूर-धाराशिव, सोलापूरमध्ये पाऊस?
सांगलीतही २ दिवस वादळी वा-यासह पाऊस पडणार आहे. लातूर-धाराशिव, सोलापूरमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे हवामानात बदल झाला आहे. त्यामुळे शेतकरी देखील चिंतेत आहेत. दिवसभर जाणवणारी उष्णता आणि रात्री गारठा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर आणि घाटमाथ्यावर आज आणि उद्या हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR