मुंबई : नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) विमान कर्मचा-यांसाठी श्वास विश्लेषक तपासणीबाबत नागरी विमान वाहतूक नियम शिथिल केले आहेत. पहिल्या प्रकरणात रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण ०.००९% पर्यंत असलेल्या आढळल्यास संबंधित कर्मचा-याचे समुपदेशन करण्यात येणार आहे. पूर्वी अशा कर्मचा-याला तीन महिने निलंबनाची तरतूद नियमात होती. मात्र वारंवार अल्कोहोलचे सेवन करणा-या कर्मचा-यांवर निलंबनाची कडक कारवाई करÞण्यात येणार आहे.
डीजीसीएने फ्लाइट क्रूसाठी सुधारित ब्रेथ अॅनालायझर नियमावली लागू केली आहे. ज्यामध्ये रक्तातील अल्कोहोल पातळीपर्यंत (०.००९ ग्रम/१०० मिली) आढळल्यास, पहिल्यांदा निलंबनाऐवजी समुपदेशन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. या नवीन नियमांतर्गत व्हिडिओ रेकॉर्डिंग अनिवार्य आहे. वारंवार मद्य सेवन करणा-यास कडक शिक्षा (निलंबन/परवाना रद्द) करण्यात येणार आहे.
पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आणि गैरप्रकार टाळण्यासाठी सर्व ब्रेथ अॅनालायझर चाचण्यांचे व्हीडीओ रेकॉर्डिंग करणे बंधनकारक आहे. दुस-यांदा मद्यप्राशन चाचणी सकारात्मक आल्यास, परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात येईल. विदेशी पायलट आणि इतर परदेशी पायलटची मद्यप्राशन चाचणी सकारात्मक आढळल्यास त्यांची अधिकृतता रद्द केली जाईल. तसेच, गैर-अनुसूचित ऑपरेटर आणि उड्डाण प्रशिक्षण संस्थांनाही हे नियम लागू आहेत. उड्डाणापूर्वी १२ तास मद्यपान न करण्याचा मूळ नियम कायम आहे. उड्डाणानंतरच्या चाचणीत सकारात्मक आढळल्यास एका वर्षासाठी परवाना निलंबित केला जाईल. ही सुधारणा ९ फेब्रुवारी २०२६ पासून लागू झाली आहे. नवीन नियमांमुळे उड्डाण सुरक्षा वाढवणे आणि कठोर नियमांमधून विमान कर्मचा-यांना दिलासा देण्याचा डीजीसीएचा प्रयत्न आहे.

