सोलापूर – श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापन अतिशय योग्य असल्यामुळेच ते शेतकरी सभासदांना जादा ऊसदर देण्यात यशस्वी होत असल्याचे सांगून कारखाना सभासदांसाठी राबवत असलेल्या योजनांबाबत साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी समाधान व्यक्त केले.
साखर आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी कुमठे येथील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यास सदिच्छा भेट दिली. त्यानंतर झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात पुलकुंडवार बोलत होते. कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांच्या हस्ते पुलकुंडवार यांचा सन्मान करण्यात आला. तर अर्थ विभागाचे संचालक यशवंत गिरी, प्रादेशिक सहसंचालक पांडुरंग साठे यांचा सन्मान कारखान्याचे अध्यक्ष अण्णाराज ऊर्फ पुष्पराज काडादी, उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते यांच्या हस्ते करण्यात आला. उपस्थितांचे स्वागत कार्यकारी संचालक रवींद्र पाटील यांनी केले.
डॉ.पुलकुंडवार म्हणाले, साखर उत्पादनाबरोबरच विविध प्रकारचे उपपदार्थ प्रकल्प उभारून सभासद शेतकर्यांचे हित जोपासण्यांमध्ये श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना निश्चितपणे अग्रेसर राहील, असा विश्वास व्यक्त करून कारखाना शेतकर्यांसाठी राबवित असलेल्या विविध योजनांबाबत समाधान व्यक्त केले. राज्याच्या अर्थकारणात सहकारी साखर उद्योगाची भूमिका महत्त्वाची आहे. कारखान्यांनी उपपदार्थ निर्मिती करून सभासद शेतकर्यांना अधिकाधिक दर देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
शासनामार्फत विविध बाबींसाठी अनुदान दिले जाते. याची माहिती घेऊन सभासदांना त्याचा लाभ मिळवून दिला पाहिजे. सध्या ऊसतोड मजुरांची असलेली समस्या विचारात घेऊन हार्वेस्टर यंत्राद्वारे उसाची तोडणी करणे आवश्यक झाले असून कमी किमतीमध्ये हार्वेस्टर यंत्र उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असून याची माहिती घेऊन हार्वेस्टर यंत्र सभासदांना उपलब्ध करून द्यावीत असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
काडादी म्हणाले, कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांनी शेतकर्यांच्या हितासाठी या कारखान्याची उभारणी केली. त्यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कारखान्याची वाटचाल सुरू असून कारखान्याने आजपर्यंत सर्वाधिक दर देऊन शेतकर्यांचे हित जोपासले असल्याचे सांगितले. यावेळी कारखान्याचे संचालक गुरुराज माळगे, शिवशंकर बिराजदार, अमर पाटील, राजशेखर पाटील, विद्यासागर मुलगे, शिवानंद बगले- पाटील, महादेव जम्मा, हरिश्चंद्र आवताडे, विशेष लेखापरीक्षक बाबासाहेब भोसले, गौतम निकाळजे, बाळासाहेब बेंद्रे, कारखान्याचे सचिव सिद्धेश्वर शीलवंत, यांच्यासह सर्व खाते प्रमुख कर्मचारी आणि कामगार यावेळी उपस्थित होते उपाध्यक्ष चाकोते यांनी आभार मानले.