लडाख : लडाखमध्ये मंगळवारी (२६ डिसेंबर २०२३) पहाटे ४:३० वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.५ इतकी नोंदवण्यात आली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, जम्मू-काश्मीरच्या पूंछ, किश्तवाड आणि कारगिलमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. हे भूकंपाचे धक्के हिमालयाच्या पर्वतराजीतही जाणवले आहेत.
गेल्या आठवड्यात सोमवारी (१८ डिसेंबर २०२३) जम्मू-काश्मीर आणि लेह-लडाखमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. लडाखमध्ये झालेल्या या भूकंपाची तीव्रता ३.८ इतकी मोजली गेली होती. तसेच जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.८ मोजली गेली. सतत भूकंपाच्या धक्क्यांमुळे खोऱ्यातील लोक भयभीत झाले आहेत.
चीनमध्येही विध्वंस
उत्तर-पश्चिम चीनमध्ये झालेल्या ६.२ तीव्रतेच्या भूकंपातील मृतांची संख्या १४९ वर पोहोचली असून दोन लोक अद्याप बेपत्ता आहेत. गेल्या नऊ वर्षांतील सर्वात तीव्र भूकंप १८ डिसेंबरच्या मध्यरात्री पृथ्वीच्या पृष्ठभागापासून १० किलोमीटर खोलीवर आला होता. चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांनी उत्तर-पश्चिम चीनमधील भूकंपग्रस्त गावांना भेट दिली आणि भूकंपग्रस्त भागातील लोक हिवाळ्यात सुरक्षितपणे राहतील याची खात्री करण्यासाठी बचाव आणि मदत पथकांना सांगितले.