Homeराष्ट्रीयकोलकात्यात ‘ईडी’ची कारवाई

कोलकात्यात ‘ईडी’ची कारवाई

कोट्यवधींची रोकड, सोने-चांदी जप्त विधानसभा निवडणुकीपूर्वी धडाका

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये २३ एप्रिल रोजी होणा-या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापूर्वी ईडीने मोठी कारवाई केली आहे. एजन्सीच्या कोलकाता झोनल कार्यालयाने शहरात ८ ठिकाणांवर छापे टाकले. ही कारवाई बिस्वजीत पोद्दार ऊर्फ ‘सोना पप्पू’, जय एस. कमदार आणि इतरांविरुद्ध सुरू असलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात करण्यात आली आहे.

या छापेमारी दरम्यान ईडीने तब्बल १.४७ कोटी रुपये रोख, ६७.६४ लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, अनेक महत्त्वाची कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत. या कारवाईत ईडीने एक फॉर्च्युनर कार देखील जप्त केली असून, ही कार बिस्वजीत पोद्दार ऊर्फ सोना पप्पू वापरत होता. एजन्सीला सोना पप्पूच्या कोलकात्यातील फर्न रोड येथील निवासस्थानातून मेड इन यूएसए असे लिहिलेले एक रिव्हॉल्व्हर देखील सापडले आहे. हे शस्त्र पुढील कारवाईसाठी पश्चिम बंगाल पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निष्पक्ष आणि भयमुक्त वातावरण सुनिश्चित करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे ईडीने म्हटले आहे. ईडीने ही चौकशी पश्चिम बंगाल पोलिस आणि कोलकाता पोलिस यांनी नोंदवलेल्या अनेक एफआयआरच्या आधारे सुरू केली होती. या प्रकरणांमध्ये आरोपींवर दंगल घडवणे, हत्येचा प्रयत्न, गुन्हेगारी कट रचणं आणि आर्म्स एक्टचे उल्लंघन करणे यांसारखे गंभीर आरोप आहेत.

बिस्वजीत पोद्दार अद्याप फरार
तपासात असे समोर आले आहे की, बिस्वजीत पोद्दार ऊर्फ सोना पप्पू आणि त्याचे सहकारी पश्चिम बंगालमध्ये संघटित गुन्हेगारी सिंडिकेट चालवून अवैध मार्गाने मोठी रक्कम गोळा करत होते. कोलकाता येथील गोलपार्कजवळील कांकुलिया रोडवर झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणातही तो हवा आहे आणि सध्या तो फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. ईडीने समन्स बजावूनही तो अद्याप तपासात सामील झालेला नाही. पीएमएलए अंतर्गत सुरू असलेल्या तपासात असा खुलासा झाला आहे की, आरोपींनी खंडणी, रिअल इस्टेटवर ताबा मिळवणे आणि बेकायदेशीर बांधकाम यांसारख्या कामातून काळा पैसा कमावला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR