नवी दिल्ली/ मुंबई : मागील काही दिवसांपासून महागाई प्रचंड वाढताना दिसत आहेत. कधी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ होते, तर कधी डाळी, भाजीपाला महाग झालेला पाहायला मिळतो. आता पुन्हा एकदा महागाईचा झटका बसणार आहे. खाद्यतेलाच्या किमती सध्या गगनाला भिडत आहेत. मोहरीचे तेल, पाम तेल आणि शेंगदाणा तेलाच्या किमती गेल्या वर्षीपेक्षा जास्त वाढत आहेत. या हंगामात अन्नधान्याच्या किमती सामान्यत: वाढतात. भाजीपाल्याच्या किमतीही वाढत आहेत. पावसामुळे पुरवठ्यावर परिणाम झाला असून त्याचा परिणाम किमतींवर दिसून येत आहे.
उत्तर प्रदेशात, सुलतानपूर, जौनपूर आणि इतर जवळच्या जिल्ह्यांमध्ये मोहरीचे तेल ७,००० ते ७,५०० रुपये प्रति क्विंटल दराने विकले जात आहे. शेतक-यांच्या मते, किमती ८,००० रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, किरकोळ विक्रेते सध्या मोहरीचे तेल २२० रुपये प्रति किलो दराने विकत आहेत. ही दरवाढ केवळ एका महिन्यात झाली आहे.
केंद्र सरकारच्या ग्राहक विभागाने जाहीर केलेल्या दरानुसार, आज देशभरात मोहरीचे तेल सरासरी १९७.२५ रुपये दराने विकले जात आहे. एका महिन्यापूर्वी ते १९४.१५ रुपये दराने विकले जात होते. सरकारी आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी १५ ऑगस्ट २०२५ रोजी मोहरीच्या तेलाची किंमत ११८.२० होती. याचा अर्थ किमतींमध्ये स्पष्ट वाढ झाली आहे. केवळ मोहरीच नाही, तर पाम तेलाच्या किमतीतही गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. १५ ऑगस्ट रोजी पाम तेलाची किंमत १४९.५७ होती. एका वर्षापूर्वी ही किंमत १३०.२४ होती. याचा अर्थ गेल्या वर्षीच्या तुलनेत किमतीत २० ने वाढ झाली आहे, जी अंदाजे १४ टक्के दरवाढ दर्शवते.
तब्बल १९ टक्क्यांची वाढ
सूर्यफूल तेलाच्या किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत १९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी किंमत १५९ होती. आज ती १९१.१६ आहे. शेंगदाण्याच्या किमतीतही मोठी वाढ होत आहे. त्याचा नवीनतम दर २०५.३९ आहे. गेल्या वर्षी याच दिवशी किंमत १८५.२६ होती, म्हणजेच १० टक्के वाढ झाली होती. काल सरकारने निर्यात होणा-या इंधनावरील कर कमी करून तेल कंपन्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने शनिवारपासून निर्यात होणा-या पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधनावरील विंडफॉल टॅक्स कमी करण्याचे आदेश दिले होते.
एफएमसीजी वस्तूही महागणार
देशात रोजच्या वापरातील एफएमसीजी वस्तूंच्या किमती पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जुलै ते सप्टेंबर २०२६ या तिमाहीदरम्यान प्रमुख कंपन्या आपल्या उत्पादनांचे दर वाढवण्याच्या तयारीत आहेत. साखर आणि पाम तेलासारख्या कच्च्या मालाच्या चढ्या दरांमुळे नफ्यावर ताण येत असल्याने कंपन्या थेट भाववाढ करण्यासोबतच श्रिंकफ्लेशनचा मार्ग अवलंबत आहेत. यामध्ये पाकिटाची किंमत तीच ठेवून त्यातील वस्तूचं वजन किंवा प्रमाण कमी केले जाते, ज्यामुळे ग्राहकांना किंमत वाढल्याचे लगेच जाणवत नाही.
















