37.8 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeसंपादकीयअति तिथं माती !

अति तिथं माती !

एकमत ऑनलाईन

गेल्या अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या एस.टी. कामगारांच्या संपाचा शेवट काय होणार? असा यक्ष प्रश्न आता उभा राहिला आहे. कामगार व सरकार यांच्यात संपुष्टात आलेला विश्वासाचा पूल बांधण्यासाठी उशिरा का असेना पण राज्यातील महाविकास आघाडीचे कर्तेधर्ते शरद पवार यांनी स्वत: मैदानात उतरत सोमवारी सर्व कामगार संघटनांच्या नेत्यांची परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह बैठक घेतली. त्यात कामगारांचे सर्व प्रश्न व मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे. कामगारांनी संप संपवून अगोदर एस. टी. रस्त्यावर आणावी. कामगारांच्या वेतनाच्या सर्व मागण्या मान्य होतील. विलीनीकरणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे. न्यायालय या संदर्भात जो निर्णय देईल तो सरकारला मान्य आहे. तेव्हा राज्यातील प्रवाशांचे होत असलेले अतोनात हाल थांबवावेत व सरकारवर विश्वास ठेवून कामगारांनी कामावर परतावे, अशी कळकळीची विनंती शरद पवार यांनी केली.

तत्पूर्वी ज्या २२ कामगार संघटनांचे नेते बैठकीला हजर होते त्यांनीही संयुक्त पत्रकार परिषदेत सर्व शंकांचे निरसन झाल्याचा व सरकार मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचा निर्वाळा देऊन कामगारांना कामावर परतण्याचे आवाहन केले. परिवहन मंत्री परब यांनी एस. टी. कर्मचा-यांना सरकार आणखी एक संधी देण्यास तयार आहे. जे कर्मचारी कामावर येतील त्यांच्यावर कारवाई होणार नाही. संपात काही लोक निलंबित झाले आहेत. त्यांच्यावरही कुठलीच कारवाई न करता त्यांना कामावर घेतले जाईल, असे स्पष्ट केले. या संयुक्त पत्रकार परिषदेनंतर खरे तर आता एस. टी. चा संप संपुष्टात येऊन लालपरी पुन्हा रस्त्यावर धावण्याचे आशादायक वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पुन्हा एकवार ते औट घटकेचेच ठरले कारण आझाद मैदानावरील संपकरी कामगारांनी आम्ही विलीनीकरणावर ठाम आहोत, अशी भूमिका घेतली. त्याच प्रकारच्या प्रतिक्रिया राज्यभरातील एस. टी. कामगारांनी समाज माध्यमांवरून व्यक्त केल्या. त्यामुळे शरद पवार यांची शिष्टाईही निष्फळ ठरल्याचेच चित्र पहायला मिळाले.

थोडक्यात पुन्हा एकवार संपक-यांना विश्वासात घेण्याचे सरकारचे प्रयत्न अपयशीच ठरले आहेत. या अपयशाचे खापर कामगार कृति समितीने वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर फोडून त्यांना हटविण्याची घोषणा केली व त्यांच्या जागी सतीश पेंडसे यांची नियुक्ती केली. मात्र, त्याचाही संपावर ठाम असणा-या कामगारांवर काहीच परिणाम झालेला नाही. या सगळ्या परिस्थितीमुळेच नेमके एस. टी.चे होणार तरी काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे आणि त्याचबरोबर हा संप आता गिरणी कामगारांच्या संपाच्याच वाटेने जात असल्याची शंका बळावत चालली आहे. स्वत: शरद पवार यांनाही ही शंका आली असावी त्यामुळेच त्यांनी ‘किती ताणायचे याचे तारतम्य कर्मचा-यांनी बाळगण्याची गरज आहे,’ असा सूचक इशारा बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत दिला आहे.

सरकार आता पर्यायी मार्गांची चाचपणी गांभीर्याने सुरू करणार, हाच याचा अर्थ! एस. टी. महामंडळाने अगोदरच कंत्राटी कामगारांना कामावर घेण्याची घोषणाही केली आहे व तशा हालचालीही सुरू केल्या आहेत. प्रत्यक्षात हा प्रयोग यशस्वी होईल की नाही, हे काळच ठरवेल पण तूर्त यामुळे अत्यंत निष्ठेने, कमी वेतनात सेवा बजावणा-या संपकरी कामगारांच्या चुली विझणार हे नक्की आहे. यात सरकारचे काहीच नुकसान होणार नाही, नुकसान होणार ते संपकरी कामगारांचे व राज्यातील सर्वसामान्य जनतेचे! कारण तसेही डबघाईला आलेले एस. टी. महामंडळ हे सरकारसाठी डोकेदुखी व गळ्यातला धोंडाच बनलेले आहे. या संपाच्या आडून गळ्यातला हा धोंडा काढून टाकण्याची संधी सरकारला मिळणार असेल तर सरकार ती साधण्याचाच प्रयत्न करू शकते.

तसेही सध्या देशात खाजगीकरणाचे जोरदार वारे वाहते आहेच व त्याद्वारे स्वत:चे व आपल्या बगलबच्च्यांचे उखळ पांढरे करून घेण्याची हातोटी सर्वच सत्ताधारी व राजकारण्यांनी प्राप्त केली आहे. त्यांना जर आयती संधी मिळाली तर जे गिरण्यांचे झाले, सहकारी साखर कारखान्यांचे झाले तेच आता एस. टी. चेही होणार, हे सांगण्यासाठी कुठल्याही भविष्यकाराची गरज नाही. असे घडले तर संप तुटेपर्यंत ताणणारे कर्मचारी तर कायमचे उद्ध्वस्त होतीलच पण सर्वांत मोठे नुकसान हे राज्यातील सर्वसामान्य जनतेचे होईल. आज एस. टी.ची सार्वजनिक वाहतूक ही राज्यातील सर्वसामान्य, गोरगरीब, विद्यार्थी, शेतकरी यांची जीवनवाहिनी आहे. तिच्याअभावी सर्वसामान्यांचे सध्या प्रचंड हाल होत आहेत. मात्र, तरीही संपक-यांबाबत सहानुभूतीच असल्याने जनता त्यांना दोषी न ठरवता हे हाल सोसते आहे व संपावर सरकारने समाधानकारक तोडगा काढावा, अशीच इच्छा व्यक्त करते आहे.

मात्र, उद्या संपक-यांच्या हेकेखोर भूमिकेने ‘अति तिथं माती’ अशी स्थिती निर्माण झाली तर राज्याची एकवेळ देशात सर्वांत अव्वल स्थानावर असणारी एस. टी.ची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मोडित काढल्याचे खापर फक्त आणि फक्त संपक-यांच्या माथीच फुटेल, हे मात्र नक्की! त्यावेळी या संपक-यांची माथी भडकावणारे सध्याचे नेते वा या संपाचा राजकीय लाभ उठवू पाहणारी मंडळी हे कुणीच उद्ध्वस्त संपक-यांच्या मदतीला येणार नाहीतच आणि सरकारही सगळे खापर या संपक-यांच्या माथी फोडून मोकळे होईल. हे सगळे कथन सध्या ‘शक्यता’ वाटत असले तरी ते तसे नाही कारण सध्या एस. टी. संपाचे नेपथ्य ज्या पद्धतीने सजविले जातेय ते पाहता थोडेही तारतम्य असणा-यास या नाटकाचा शेवट काय होणार? याची सुस्पष्ट कल्पना येते. त्यामुळे आता आपली भाकरी देणारी एस. टी. सुरू ठेवण्याची व स्वत:ची चूल विझू न देण्याची सद्बुद्धी संपकरी कर्मचा-यांना होण्याची जशी गरज आहे तशीच राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी जिवंत राहील यासाठी सामान्य जनतेनेही रेटा उभा करण्याची गरज आहे.

एस. टी. महामंडळाचा शेवट मुंबईतील गिरण्यांप्रमाणे होऊ नये, यासाठी सामान्यांना व एस. टी. कामगारांना दक्ष राहणे आवश्यक बनले आहे. अन्यथा एस. टी.च्या राज्यभरातल्या स्थानकांच्या मोक्याच्या जागा, डेपो, ताफ्यातील हजारो वाहने, यंत्रशाळा, स्वत:ची इंधन साठवण्याची प्रचंड मोठी यंत्रणा, कुशल मनुष्यबळ, तंत्रज्ञ या भल्या मोठ्या तिजोरीवर टपून बसलेल्या बोक्यांना लोण्याचा गोळा गट्टम करण्याची आयती संधीच मिळणार आहे. त्यामुळे एस. टी. संपाच्या निमित्ताने एस. टी.च्या मारेक-यांची जी साखळी निर्माण झाली आहे ती आता राज्यातील जनतेलाच मोडून काढावी लागणार आहे कारण सरकारमध्ये ही साखळी मोडून काढण्याची हिंमत नाही व तशी इच्छाशक्तीही नाही, हे एव्हाना सुस्पष्टच झाले आहे. त्यामुळेच एस. टी.चा संप मिटविण्यासाठी सरकार म्हणून सामूहिक व एकत्रित प्रयोग होताना दिसत नाहीत. शरद पवारांची शिष्टाईही दोन महिन्यांनंतर होते, हे ही येथे लक्षात घेतले पाहिजे. तेव्हा ‘अति तिथं माती’ नकोच, हे लक्षात घ्यायलाच हवे!

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या