29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeसंपादकीयआयाराम-गयाराम!

आयाराम-गयाराम!

एकमत ऑनलाईन

बदल हा सृष्टीचा नियमच आहे. मानवी जीवनात बदल हे होतच असतात. एकच एक गोष्ट मनाला बरी वाटत नाही. घरातसुद्धा आपण काहीतरी बदल करतच असतो. कधी आसन व्यवस्था बदलतो, जेवणातही बदल करतो. ऋतुमानात बदल झाले की त्याची लगेच जाणीव होते. त्यामुळे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा माणसाला एक प्रकारची ऊर्मी देतात. राजकारणात होणारे बदल मात्र मनाला फारसे भावत नाहीत. कारण ते स्वार्थाने, सत्तापिपासूपणाने भारलेले असतात. सत्तारूपी लोण्याचा गोळा मटकावण्यासाठी त्यात बदल होत असतात. जनतेचे कल्याण करण्यासाठी आम्हाला सत्ता हवी आहे असे राजकीय नेते कितीही सांगत असले तरी त्याला स्वाहाकाराचा वास आहे. म्हणून सर्वसामान्य माणूस या बदलाकडे तिरस्कारानेच पाहतो. स्वार्थापोटीच राजकारणात आयाराम-गयारामची जमात निर्माण झाली आहे.

निवडणूक म्हणजे या जमातीसाठी सुगीचे दिवस असतात. निवडणुकीसाठी आपल्याला तिकिट मिळणार नाही याची खात्री पटल्यानंतर या मंडळींच्या बेडूकउड्या सुरू होतात. एका पक्षातून दुस-या पक्षात उडी मारणे सुरू होते. यात मंत्री, आमदार आणि कार्यकर्त्यांचा समावेश असतो. वर्षानुवर्षे ज्या पक्षाच्या घोषणा दिल्या त्या पक्षाच्या विरोधातच घोषणा दिल्या जातात. दुस-या पक्षात जाताना तुमचाच पक्ष सर्वदृष्टीने आदर्श वाटतो अशी विनोदी भाषा बोलली जाते. वस्तुत: याच पक्षातून दोन-तीन वेळा त्यांनी दुस-या पक्षात प्रवेश केलेला असतो. म्हणजे या महाभागांना आपण मूळ कोणत्या पक्षात होतो तेच आठवत नाही. शेवटी हे जेव्हा लक्षात येते तेव्हा आपण स्वगृही परतत आहोत अशी भाषा केली जाते. एखादा मंत्री जेव्हा पक्षत्याग करतो तेव्हा त्याला पदावर असतानाच पक्षत्याग करावा असे का वाटत नाही? कदाचित त्यावेळी तो स्वार्थाने अथवा स्वाहाकाराने आंधळा झालेला असावा. खरे पाहता हे लोकशाहीचे विडंबन म्हणावे लागेल. केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांत विधानसभेच्या निवडणुका घोषित केल्या आहेत.

त्या अनुषंगाने आता प्रत्येक पक्षात फोडाफोडीची बजबजपुरी माजली आहे, पक्षबदलाचे वारे वाहू लागले आहेत. थंडीच्या दिवसांत थंड वारे जसे वाहू लागतात तसे निवडणुका जाहीर झाल्या की पक्षबदलाचे वारे वाहू लागतात. वारा कोणत्या दिशेने वाहतोय याचा कानोसा घेऊन पक्षबदलू मंडळी कामाला लागतात. काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपमध्ये जातात तर भाजपमधील कार्यकर्ते समाजवादी पक्ष अथवा काँग्रेसच्या आश्रयाला जातात. विशेषत: उत्तर प्रदेशमध्ये पक्षबदलाचे वारे जोरात वाहताना दिसत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये गत ३-४ दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर राजकीय भूकंपाचे हादरे बसत आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातील तीन मंत्री आणि पाच आमदारांनी पदाचा राजीनामा देत भाजपला रामराम ठोकला आहे. यातील बहुतेक मंत्री आणि आमदार ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. यातील बहुतेकांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. कामगारमंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा दिल्यानंतर उत्तर प्रदेशचे वन व पर्यावरण मंत्री दारासिंह चौहान यांनीही राजीनामा दिला. त्यामुळे सत्तारूढ पक्षाला भगदाड पडले आहे. काँग्रेस व समाजवादी पक्षाच्या प्रत्येकी एका आमदाराने भाजपमध्ये प्रवेश केला. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून राज्याच्या राजकारणात मोठे फेरबदल होत आहेत.

भाजप, काँग्रेस, सपा आणि बसपामध्ये दररोज पक्षांतर होत आहे. जणू काही मंत्र्यांचा राजीनामा आणि आमदारांनी सोडचिठ्ठी देण्याचे सत्रच सुरू झाले आहे. राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपमध्ये राहून आपण निष्ठा आणि मेहनतीने काम केले परंतु योगी आदित्यनाथ सरकारमध्ये दलित, मागसवर्गीय यांना न्याय मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे या सरकारमधून बाहेर पडणे योग्य वाटले असे राजीनाम्याचे कारण मधुबन मतदारसंघाचे आमदार चौहान यांनी दिले आहे. निवडणुका लागल्यानंतरच असा साक्षात्कार कसा काय झाला? असा प्रश्न चौहान यांना विचारला पाहिजे. गरीब, मागास व दलित मतांच्या जोरावर भाजपचे सरकार बनले परंतु वेळोवेळी समाजाच्या पदरी निराशाच पडली असे चौहान यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे आमदार नरेश सैनी आणि समाजवादी पक्षाचे आमदार हरी ओम यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हे दोन्ही आमदार मागासवर्गीय आहेत. मजेची गोष्ट म्हणजे मागासवर्गीयांच्या मार्गात भाजप खोडा ठरतोय म्हणून आमदार चौहान यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली तर मागासवर्गीयांचे उद्धारकर्ते भाजपच म्हणून सैनी आणि हरी यादव यांनी भाजपशी घरोबा केला. हे गणित सामान्य जनतेला न समजण्याजोगे आहे. यालाच राजकारण म्हणायचे! योगी आदित्यनाथ मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यानंतर कामगारमंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांच्या विरोधात सुलतानपूर जिल्हा न्यायालयाने बुधवारी अटक वॉरंट जारी केले.

२०१४ साली धार्मिक तेढ निर्माण करणारे प्रक्षोभक भाषण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. देव-देवतांचा अपमान करत धार्मिक भावना भडकावणारे वादग्रस्त भाषण मौर्य यांनी केले होते. तेव्हा ते बहुजन समाज पक्षाचे महासचिव आणि राज्याचे विरोधी पक्षनेते होते. आता भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर अवघ्या २४ तासांत त्यांना न्यायालयाने दणका दिला आहे. याला योगायोग म्हणायचा की सुडाचे राजकारण? उत्तर प्रदेशमध्ये एकामागून एक मंत्री राजीनामा देत असल्याने आणि त्यांच्याबरोबर आमदारसुद्धा पक्ष सोडून जात असल्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वगुणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. भाजपमधील पडझड रोखण्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सोपविण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांना नाराज भाजप मंत्री, आमदार व नेत्यांशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे. निवडणुका लागल्या की आयाराम-गयारामांची फौज कार्यरत होते. त्यामुळे प्रत्येक पक्षाला पक्षांतर समस्येला तोंड द्यावे लागते. पक्षांतर्गत फोडाफोडीच्या कारवाया रोखता येत नाहीत. त्यासाठी पक्षांतर बंदी कायदा आणि त्याची कडक अंमलबजावणी करावी लागेल. त्याशिवाय आयाराम-गयारामांचे पीक नामशेष होणार नाही.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या