22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeसंपादकीय‘ओमिक्रॉन’ चे भय!

‘ओमिक्रॉन’ चे भय!

एकमत ऑनलाईन

कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला सुखा- समाधानाने जगूच द्यायचे नाही, असा निर्धार केलेला दिसतो. जगाला चार लाटांचा फटका दिल्यानंतरही त्याचे समाधान झालेले दिसत नाही. पहिल्या दोन लाटांचा जोर ओसरल्यानंतर त्याने आपले उपप्रकार पाठवण्यास सुरुवात केली. वेगवेगळ्या रूपांत तो जगाला भेडसावू लागला. जगाने चार लाटा अनुभवल्या. भारताला दोन लाटांचा तडाखा बसला. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयानक होती. तिसरी लाट येणार येणार, अशी दवंडी पिटली गेली परंतु सुदैवाने तिसरी लाट आलीच नाही. लोकांच्या मनातून कोरोनाचे भय गेलेले नाही. देशातील सारे व्यवहार सुरळीत होण्याच्या मार्गावर असतानाच आता कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ नामक नव्या उत्परिवर्तित विषाणू प्रकार आढळला असून तो ‘डेल्टा’ पेक्षाही घातक असल्याने जगभर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या नव्या विषाणूच्या भयामुळे अनेक देशांनी दक्षिण आफ्रिकी देशातील प्रवासावर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेतील विमानसेवेवर परिणाम झाला आहे. तेथे कडक लॉकडाऊन केले जाण्याची शक्यता आहे. द. आफ्रिकेतील शास्त्रज्ञांनी नव्या विषाणूचा शोध जाहीर केल्यानंतर तेथून येणा-या विमानांवर अमेरिका, इंग्लंड आणि काही यूरोपीय देशांनी बंदी घातली. द. आफ्रिकेत कोरोनाचे रुग्ण नोव्हेंबर महिन्यापासून मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. अन्य देशांनी द. आफ्रिकेवर निर्बंध घातल्याने द. आफ्रिकेने नाराजी व्यक्त केली आहे. द. आफ्रिकेचे लसशास्त्रज्ञ शबीर यांनी म्हटले आहे की, आमच्या देशावर बंदी घातल्याने आपण कोरोनाच्या नव्या विषाणूला रोखू, असे विकसित देशांना वाटत असेल तर ते मूर्खपणाचे आहे. द. आफ्रिकेत प्रवास न करणा-या किंवा संपर्कात न आलेल्यांनाही लागण होत असून नव्या विषाणूने आधीच आपला मार्ग शोधला आहे. द. आफ्रिकेत नव्या विषाणूचा शोध लागला याचा अर्थ तो येथील विषाणू आहे, असा होत नाही. कोरोनाच्या नव्या विषाणूचा शोध लावण्यात आम्ही यशस्वी झालो ही आमची चूक आहे का? असा सवालही त्यांनी केला.

द. आफ्रिकेतील विमानसेवा ठप्प झाल्याने त्याचा पर्यटनाला मोठा फटका बसला आहे. २०२० मध्ये द. आफ्रिकेला १० बिलियन डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागले होते. खरे तर याआधी द. आफ्रिकेत जगातील सर्वांत कडक लॉकडाऊन करण्यात आले होते. प्रवासबंदीसह मद्य आणि सिगारेटच्या विक्रीवरही बंदी घालण्यात आली होती. जगभर दहशत निर्माण करणा-या ‘ओमिक्रॉन’ विषाणूसंबंधीची माहिती सर्वप्रथम द. आफ्रिकेतील महिला डॉक्टर अँजलिक यांनी दिली होती.‘ओमिक्रॉन’बद्दल उगाच भीती निर्माण केली जाते, असे त्यांचे म्हणणे आहे. या नवीन विषाणूचा संसर्ग झाल्यास अगदी सौम्य प्रकारची लक्षणे दिसून येतात. संशयित रुग्णांपैकी अनेक जण रुग्णालयात दाखल न होताच ठणठणीत असल्याचा दावाही त्यांनी केला. ‘ओमिक्रॉन’च्या संशयित रुग्णांमध्ये स्रायूदुखी, घशातील खवखव, कोरडा खोकला अशी सौम्य प्रकारची लक्षणे आढळली आहेत. फार कमी रुग्णांना ताप आला होता. या विषाणूचा संसर्ग चाळिशीच्या आतील लोकांना झाल्याचे आढळले, असे अँजलिक यांनी म्हटले आहे.

यूरोपातील अनेकांना या विषाणूचा संसर्ग होऊन गेला असेल, असेही त्या म्हणाल्या. अनेक देशांनी द. आफ्रिकेवर निर्बंध लावण्याचा निर्णय घेतल्याने द. आफ्रिकेला वाईट वाटणे साहजिक आहे. परंतु कोरोना विषाणूची दहशतच इतकी मोठी आहे की कोणताही देश धोका पत्करण्यास तयार नाही. या विषाणूने सा-या जगाची अर्थव्यवस्थाच कोलमडून टाकली आहे. एका घराला आग लागल्यानंतर त्याच्या आजूबाजूची घरे त्यापासून बचाव करण्यासाठी उपाययोजना करणारच.‘ओमिक्रॉन’च्या भयामुळे अनेक देशांनी द. आफ्रिकी देशातील प्रवासावर निर्बंध आणले आहेत. या विषाणूचा फैलाव वेगाने होत असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, इराण, जपान, थायलंड आणि अमेरिकेने द. आफ्रिकी देशांतून होणा-या हवाई वाहतुकीवर बंधने घातली आहेत. यूरोपीय महासंघ आणि इंग्लंडने आधीच प्रवासी निर्बंध लागू केले आहेत. भारतातही ‘ओमिक्रॉन’ विषाणूच्या प्रतिबंधासाठी सतर्क राहण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. त्यांनी वरिष्ठ अधिका-यांची बैठक घेऊन देशात सतर्कता बाळगण्याचे आदेश दिले.

भारतीय हवाई वाहतूक मंत्रालयाने तीन दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतूक १५ डिसेंबरपासून सुरू करण्याचे जाहीर केले होते. त्या निर्णयाचा फेरविचार करण्याचा आदेशही पंतप्रधानांनी दिला आहे. ‘ओमिक्रॉन’च्या धोक्याबाबत लोकांनी अधिक सावध राहण्याचे, मुखपट्टी वापरण्याचे आणि एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी केले आहे. महाराष्ट्रातही राज्य शासनाने सावधता बाळगण्याच्या दृष्टीने उपाययोजना सुरू केली आहे. त्यानुसार सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, रिक्षा वा टॅक्सीमधून प्रवास, मॉल्स, व्यापारी संकुलामध्ये प्रवेश तसेच सार्वजनिक ठिकाणी होणा-या कार्यक्रमासाठी लसीकरण झालेले बंधनकारक करण्यात आले आहे. यापुढे मुखपट्टी नसल्यास ५०० रु दंड, नियमांचे उल्लंघन करणा-यांबरोबरच त्याला प्रवेश देणा-यालाही दंड करण्यात येणार आहे. यापुढे मुखपट्टीच आवश्यक आहे.

तोंडाला रुमाल गुंडाळल्यास ५० रुपये दंड केला जाणार आहे. आधीच जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील सर्व शाळा १ डिसेंबरपासून सुरू होतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हटले आहे. लातूर जिल्ह्यात नव्या विषाणूचा शिरकाव होणार नाही या दृष्टीने उपाययोजना आखाव्यात, असे सतर्कतेचे निर्देश पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. डेल्टापेक्षाही भयानक ‘ओमिक्रॉन’ विषाणूचा राज्यात प्रवेश होऊ नये म्हणून राज्यातील प्रत्येक जिल्हाधिका-यांनी त्यांच्या पातळीवर सुरक्षेचे निर्णय घ्यावेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूचित केले आहे. राज्यात पुन्हा टाळेबंदी नको असेल तर बंधने, नियम पाळावेच लागतील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात लसीकरणाची व्यापकता वाढवावी लागेल आणि कोरोना नियमावलीची कठोर अंमलबजावणी करावी लागेल.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या