18.9 C
Latur
Thursday, January 20, 2022
Homeसंपादकीयचोर-पोलिस!

चोर-पोलिस!

एकमत ऑनलाईन

बालपणीच्या निरागस जीवनाची आठवण प्रौढ झाल्यानंतर क्षणोक्षणी येत राहते. जीवन खूप सुंदर आहे असे बाल्यावस्थेत वाटत असते पण लहानाचे मोठे झाल्यानंतर आणि मोहमाया दुनियेचे टक्केटोणपे खाल्ल्यानंतर जीवन खूप कठीण असल्याचा प्रत्यय येतो. म्हणूनच मागे वळून पाहताना ‘लहानपण देगा देवा…’ असा विचार मनात येणे साहजिक आहे. बाल्यावस्थेत मुलांना कसलीच चिंता नसते. खाणे-पिणे-खेळणे-हुंदडणे हा एकच ध्यास असतो. मैत्री करताना जातीपातीचा विचार केला जात नाही. मनोरंजनार्थ वेगवेगळे खेळ खेळले जातात. शिवणापाणी, लंगडी, नवरा-बायको, चोर-पोलिस असे खेळ खेळले जातात. मुले चौकसबुद्धीने सभोवतालचे निरीक्षण करीत असतात आणि त्याचेच अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. लहानपणी ज्या गोष्टी नवलाईच्या वाटतात त्या गोष्टींना मोठेपणी धक्के बसत असल्याचे पाहून आश्चर्यचकित होण्याची वेळ येते.

बालपणी पोलिस चोरांना पकडतात, आपले रक्षण करतात हा समज दृढ झालेला असतो परंतु मोठेपणी पोलिसच चो-यामा-या करतात, लबाड्या करतात हे पाहिल्यानंतर कल्पनांचे मनोरे ढासळताना दिसतात. सध्या वर्तमानकाळात जे काही घडत आहे ते पाहिल्यानंतर भूतकाळच बरा होता असे म्हणण्याची वेळ येते. सध्या खंडणीप्रकरणी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचे प्रकरण गाजत आहे. खंडणीच्या गुन्ह्याप्रकरणी परमबीर सिंह यांना महानगर दंडाधिका-यांनी फरारी आरोपी घोषित केले आहे. त्यामुळे ३० दिवसांत परमबीर न्यायालयासमोर हजर न झाल्यास त्यांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई होऊ शकते. परमबीर यांच्याविरोधात अटक वॉरंट काढण्यात येऊनही त्यांचा ठावठिकाणा लागत नाही. त्यामुळे फौजदारी दंड संहितेच्या कलम ८२ अन्वये परमबीर यांना फरारी आरोपी घोषित करण्याची मागणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने महानगर दंडाधिका-यांकडे केली होती. तसेच तपासासाठी त्यांची उपस्थिती निश्चित करण्याच्या दृष्टीने त्यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देण्याची मागणीही केली होती.

परमबीर यांच्याबरोबर सहआरोपी विनयसिंह आणि रियाज भाटी यांनाही अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी यांनी फरारी आरोपी घोषित केले आहे. गोरेगावमधील बिमल अग्रवाल या बिल्डरने नऊ लाख रुपयांच्या खंडणीचा आरोप करून पोलिसांत त्यांची तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची दखल घेत गोरेगाव पोलिसांनी या प्रकरणी परमबीर, सचिन वाझे यांच्यासह सुमित सिंह, अल्पेश पटेल, विनय सिंह आणि रियाज भाटी या आरोपींवर खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. सचिन वाझे यांना ११ लाख ९२ हजारांचा हप्ता दिल्याचे अग्रवाल यांनी तक्रारीत म्हटले होते. बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे या प्रकरणी आरोपी असून नुकतीच त्यांची गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली आहे. अँटालिया स्फोटक प्रकरणात वाझे यांना अटक झाल्यानंतर परमबीर यांना मुंबईच्या पोलिस आयुक्त पदावरून हटविण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता.

परमबीर यांच्यावर ठाणे येथेही खंडणीचा गुन्हा दाखल आहे. न्यायालयाने परमबीर यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केल्यानंतर ते बजावणा-या अधिका-यांनी तिन्ही आरोपींना त्यांच्या पत्त्यावर शोधण्याचा प्रयत्न केला मात्र ते तेथे आढळले नाहीत. परमबीर यांच्या मलबार हिल येथील निवासस्थानी चौकशी केली असता ते आणि त्यांचे कुटुंबिय गत तीन महिन्यांपासून या ठिकाणी राहत नसल्याचे सांगण्यात आले. इथे असा प्रश्न उपस्थित होतो की परमबीर खरोखरच निर्दोष असतील, स्वच्छ असतील तर ते गायब होण्याचे कारण काय? ‘कर नाही तर डर कशाला?’ या उक्तीप्रमाणे ते पोलिसांसमोर हजर का होत नाहीत. मध्यंतरी तर परमबीर यांनी बाहेरदेशी पलायन केल्याची शंका व्यक्त करण्यात येत होती. याआधीही विजय माल्ल्या, निरव मोदी या घोटाळेबाज व्यक्तींनी परदेशी पलायन केल्याचा इतिहास ताजा आहे. सध्या परमबीर यांचा ठावठिकाणा लागत नाही. उलट त्यांनी संरक्षण देण्याची मागणी करणारी याचिका वकिलामार्फत सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.

परंतु न्या. एस. के. कौल आणि न्या. सुंदरेश यांच्या खंडपीठाने ही मागणी फेटाळताना ‘तुम्ही कुठे आहात हे आधी जाहीर करा’ असे सांगत परमबीर यांची खरडपट्टी काढली आहे. तुम्ही कुठे आहात हे आम्हाला कळल्याशिवाय कुठलेही संरक्षण दिले जाणार नाही अथवा सुनावणी केली जाणार नाही असे खंडपीठाने म्हटले आहे. न्यायालयाने दिलेले निर्देश अगदी योग्य आहेत. कारण घोटाळेबाज मंडळी एकदा का भारताबाहेर गेली की पुन्हा भारतात परतत नाही असे अनेक प्रकरणांत आढळून आले आहे. म्हणून न्यायालयाने म्हटले आहे की, तुम्ही संरक्षक आदेशाची मागणी करत आहात, पण तुम्ही कुठे आहात हे कुणालाही ठाऊक नाही. कदाचित तुम्ही विदेशात बसला असाल आणि वकीलपत्राद्वारे कायदेशीर आधार घेत असाल, असे असेल आणि न्यायालयाने तुम्हाला अनुकूल निर्णय दिल्यास तुम्ही भारतात याल. तुमच्या मनात काय आहे हे आम्हाला माहीत नाही. तुम्ही कुठे आहात हे आम्हाला कळेपर्यंत कुठलेही संरक्षण मिळणार नाही किंवा सुनावणी होणार नाही.

परमबीर यांना सुरक्षित वाटल्यास ते समोर येतील असा युक्तिवाद परमबीर यांच्या वकिलांनी केला होता, त्यावरून न्यायालयाने त्यांना झापले आहे. घोटाळेबाज मंडळी एकदा का भारताबाहेर गेली की त्यांंना परत आणण्याची प्रक्रिया वेळखाऊ आणि क्लिष्ट असते. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही फरारी आर्थिक गुन्हेगारांना इशारा देताना म्हटले आहे की, सरकार फरारी आर्थिक गुन्हेगारांना मायदेशी आणण्यासाठी सर्व मार्ग वापरत आहे, त्यांच्याकडे देशात परत येण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अशा फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी राजनैतिक स्तरावरही प्रयत्न केले जात आहेत. परतण्यासंबंधीचा इशारा देताना पंतप्रधानांनी कोणत्याही आर्थिक गुन्हेगाराचे नाव घेतले नाही. सरकारने विजय माल्ल्या, निरव मोदी यासाख्या फरारी आर्थिक गुन्हेगारांचे प्रत्यार्पण करण्याचे प्रयत्न तीव्र केले आहेत. थकबाकीदारांकडून ५ लाख कोटी रुपये वसूल करण्यात आल्याचा दावाही पंतप्रधानांनी केला आहे. मुळात अशा गुन्हेगारांचे भारताबाहेर पलायन होतेच कसे हा प्रश्न आहे!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या