18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeसंपादकीयट्रम्पासुर !

ट्रम्पासुर !

एकमत ऑनलाईन

अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाला व अमेरिकेच्या जनतेला भस्मासुराची कथा माहिती असण्याची शक्यता तशी धूसरच! त्यामुळे या कथेतून मिळणारा बोधही त्यांना ज्ञात नसणे साहजिकच! मात्र, कथा माहिती नसली तरी त्याचा अनुभव अमेरिकी जनतेने डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या रूपाने एकदा घेतला आहेच. अमेरिकी जनता तशी प्रगल्भ व विचारीच. त्यामुळे एकदा अनुभव आल्यावर ती लगोलग शहाणी झाली आणि मागच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना पराभूत करून अमेरिकी जनतेने या ‘ट्रम्पासुरा’ला बाटलीबंद केले. मात्र, जे शहाणपण अमेरिकी जनतेने दाखविले ते हा ट्रम्पासुर जन्माला घालणा-या रिपब्लिकनांना आलेच नाही. हा ट्रम्पासुर आक्रस्ताळी, आत्मकेंद्री, गर्विष्ठ, अहंकारी व अत्यंत प्रतिगामी विचारांचा आहे व त्याच्या हाती सत्ता देणे म्हणजे महासत्ता अमेरिकेची स्वत:च्याच हाताने राखरांगोळी करून घेणे आहे, हे या ट्रम्पासुराच्या बेमूर्वत वर्तणुकीतून एकवार सुस्पष्ट झालेले असतानाही रिपब्लिकनांना त्याला पक्षातून दूर केले पाहिजे, हे शहाणपण काही सुचले नाहीच.

कदाचित त्यामागे हा ट्रम्पासुर कसा का असेना पण तो आपल्याला निवडणुकीत विजयी करू शकतो, हा स्वार्थी विचार रिपलिब्लकनांच्या मनात रुजला असावा. असो! आता हा अतिविश्वासाचा फुगाही अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीच्या निकालांनी फुटला आहे. आजवर अमेरिकेतल्या सर्व डेमोक्रॅटिक अध्यक्षांना मध्यावधी निवडणुकीने छळले आहे, हाच इतिहास! त्यास अगदी बराक ओबामासारखा लोकप्रिय नेताही अपवाद ठरलेला नाही. त्यामुळे जो बायडन यांचा मध्यावधी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यासारख्या नेत्यासमोर निभाव लागणार नाही, याची अमेरिकेतील राजकीय विश्लेषकांना, तज्ज्ञांना, निरीक्षकांना आणि प्रसार माध्यमांना जणू खात्रीच पटली होती. त्यात ट्रम्प यांनी सर्व शक्ती पणाला लावून व प्रचंड पैसा ओतून ही निवडणूक प्रचंड प्रतिष्ठेची करत जबरदस्त वातावरणनिर्मिती केली होती. त्यामुळे मध्यावधीत अमेरिकेत रिपब्लिकनांचे लाल वादळ येणारच या ट्रम्प यांच्या दाव्यावर सर्वांनीच विश्वासाची मोहर उमटवली होती.

कोरोना महासाथीचे संकट, त्यातून निर्माण झालेले अर्थसंकट, बोकाळलेली महागाई, मंदीची लागलेली चाहूल व त्यातून नोकर कपातीच्या सत्राने वाढत चाललेली बेरोजगारी यात बायडन यांचा तसा थेट दोष नसला तरी ही सगळी स्थिती डोनाल्ड ट्रम्प यासारख्या नेत्याच्या पथ्यावर पडणारीच! ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारात त्याचा वारेमाप वापरही केला. जो बायडन यांच्यावर ट्रम्प यांनी प्रचंड आगपाखड केली. अमेरिकेत सध्या उद्भवलेल्या परिस्थितीवर अमेरिकी जनतेतही मोठा असंतोष आहेच. तो ट्रम्प यांच्या पथ्यावर पडणार, असाच सर्वांचा होरा होता. मात्र, प्रगल्भ व विचारी अमेरिकी जनतेने तो साफ चुकीचा ठरवला. रिपब्लिकनांना जरी शहाणपण आले नसले तरी जनतेने शहाणपणा ठेवून हा ट्रम्पासुर बाटलीबंद राहण्यातच अमेरिकेचे हित आहे, हे पुन्हा एकवार रिपब्लिक पक्षाला ठणकावून सांगितले. डेमोक्रॅटिक पक्षाने सिनेटवर वर्चस्व प्रस्थापित केले व अमेरिकेत इतिहास घडला.

जो बायडन यांच्या कामकाजावर व धोरणांवर अमेरिकी जनतेने दाखविलेला हा विश्वासच आहे. शिवाय रिपब्लिकन पक्षाच्या धुरिणांना ट्रम्प यांच्यासारख्या नेत्यावर विसंबून न राहण्याचा मिळालेला हा इशाराच आहे. खालच्या सभागृहात म्हणजे प्रतिनिधीगृहात रिपब्लिकन पक्षाला कसेबसे बहुमत प्राप्त झाले खरे पण ट्रम्प दावा करत होते तसे लाल वादळ अमेरिकेत कुठेच दिसले नाही. या घडामोडीने आता रिपब्लिकन पक्षाला नक्कीच खडबडून जागे केले असणार! त्यामुळे या ट्रम्पासुराचे नेमके करायचे काय? हा प्रश्न आता रिपब्लिकन पक्षातील ट्रम्प यांच्या सहका-यांना पडला असल्यास काहीच नवल नाही. मात्र, आता अडचण ही की, रिपब्लिकनांनी सत्ताप्राप्तीसाठी जन्माला घातलेला हा ट्रम्पासुर पक्षापेक्षाही मोठा झाला आहे. त्याला आता सत्तेची एवढी चटक लागली आहे की, त्यात अडथळा ठरणा-या स्वकियांनाही तो भस्म केल्याशिवाय राहणार नाहीच. याचाच थेट पुरावा या ट्रम्पासुराने २०२४च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आपली रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारी जाहीर करून दिला आहे. ट्रम्प यांना त्यांच्या पक्षाला मध्यावधी निवडणुकीत घवघवीत यश मिळवून देता आलेले नाहीच.

त्यामुळे त्यांच्या पक्षनेतृत्वावर अमेरिकी जनतेने शिक्कामोर्तब केलेले नाही, हेच स्पष्ट होते. मात्र, सत्तेची चटक लागलेल्या या भस्मासुराने जसा अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील आपला पराभव अमान्य करून आपल्या समर्थकांकरवी व्हाईट हाऊसमध्ये हैदोस घातला तसेच आता मध्यावधी निवडणुकीत दणदणीत विजय मिळविण्यात अपयश आलेले असतानाही ते साफ नाकारून आपलेच घोेडे पुढे दामटवण्याची चाल सुरू केली आहे. आपल्या पक्षनेतृत्वावर पक्षातच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असले, सहका-यांचा आपल्यावरील विश्वास ढळला असला व पक्षात चलबिचल निर्माण झाली असली तरी या ट्रम्पासुरास त्याची अजिबात फिकीर नाही. पक्षातून कुणी आपल्याला विरोध करूच शकत नाही, हा फाजिल आत्मविश्वास दाखवत ट्रम्प यांनी २०२४ च्या अध्यक्षपदासाठी स्वत:ची उमेदवारी जाहीर करून टाकली आहे. खरे तर अध्यक्षपदाच्या निवडणुकीस अद्याप तब्बल दोन वर्षांचा कालावधी शिल्लक आहे व या दोन वर्षांत अमेरिकेत व रिपब्लिकन पक्षातही बरेच काही घडू शकते. मध्यावधी निवडणुकीच्या निकालानंतर रिपब्लिकन पक्षात डोनाल्ड ट्रम्प यांना पक्षाच्या नेतेपदावरून दूर करण्याचा विचार बळावू शकतो व पक्ष अध्यक्षपदासाठी नवा चेहरा देऊ शकतो.

मात्र, त्याची फिकीर करण्याची गरज नाही किंवा असे होऊ शकते तर अगोदरच आक्रमण करून विरोध मोडून काढूया यापैकी एका विचाराने या ट्रम्पासुराने आपली उमेदवारी जाहीर करून टाकण्याची चाल खेळली आहे. थोडक्यात ज्या पक्षाने आपले नेतृत्व जन्माला घातले त्याच पक्षाला आपल्या आसुरी महत्त्वाकांक्षेसाठी भस्म करायला हा ट्रम्पासुर सज्ज झाला आहे, हाच या घडामोडीचा स्पष्ट अर्थ! आता या ट्रम्पासुराला रिपब्लिकन पक्षातील त्याचे सहकारी शरण जातात की, त्यालाच भस्म करण्याचा मार्ग शोधतात हे येत्या काळात कळेलच. ट्रम्प यांची अमेरिकेतील लोकप्रियता पाहता इतर कुठल्या रिपब्लिकन नेत्यास त्यांना थेट वैयक्तिक आव्हान देणे शक्य होईल, असे सध्या तरी दिसत नाही. पक्षांतर्गत असे आव्हान उभे करायचे तर संपूर्ण पक्षाला असे आव्हान देण्यात पुढाकार घेणा-याच्या पाठिशी अत्यंत ठामपणे व एकत्रितरीत्या उभे राहावे लागेल कारण हा ट्रम्पासुर आता पक्षापेक्षाही आपणच मोठे या थाटात बेताल बनला आहे. त्याला आवरायचे तर एकीचे बळच दाखवावे लागेल. ते रिपब्लिकन किती दाखवतात, हेच आता पहायचे. तूर्त हा ट्रम्पासुर पक्षाला आवरो की न आवरो पण अमेरिकी जनतेने शहाणपण दाखवत त्याला नाकारले आहे, हे ही नसे थोडके!

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या