22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeसंपादकीयद्रष्टा नेता... सच्चा मित्र !

द्रष्टा नेता… सच्चा मित्र !

एकमत ऑनलाईन

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची नारा शहरात भरदिवसा, भररस्त्यात हत्या झाल्याने केवळ जपानलाच नव्हे तर संपूर्ण जगाला धक्का बसला आहे. जपानच्या पंतप्रधानपदावर सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम नावावर असणा-या आबे यांनी दोन वर्षांपूर्वी प्रकृतीच्या कारणावरून पंतप्रधानपद सोडण्याचा आणि सक्रिय राजकारणापासून बाजूला होण्याचा निर्णय घेतला असला तरीही ते त्यांच्या पक्षाचे व जपानच्या जनतेचे अत्यंत लोकप्रिय व महत्त्वाचे नेते होते. पद सोडल्यावर दोन वर्षांनी ‘त्यांची धोरणे आवडत नाहीत’ असा दावा करत ४१ वर्षीय माथेफिरूने त्यांची गोळ्या घालून हत्या केली. जपानमध्ये बंदुका, रायफली आदी शस्त्रास्त्रं बाळगण्याबाबत कठोर नियम व कायदे आहेत.

त्यामुळे या देशात शस्त्र बाळगणा-यांचे प्रमाण अत्यंत कमी आहे आणि गोळीबार करून हत्या करण्याच्या घटनांचे प्रमाणही अत्यल्प आहे. अशा स्थितीत दोन वर्षांपूर्वी पदत्याग केलेल्या नेत्याला भररस्त्यात गोळ्या घालून ठार करण्याची घटना ही एका मोठ्या कटाचाच भाग असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू केली आहे. यातून या हत्येमागचा कट व असा कट रचणारा किंवा रचणारे कोण? हे बाहेर येईलच. मात्र, जपानने देशाचा एक द्रष्टा, खमक्या नेता गमावला आहे तर भारताने आपला एक सच्चा मित्र गमावला आहे. आबे यांच्या हत्येने जपानएवढेच भारताचेही प्रचंड नुकसान झाले आहे आणि ते कधीही भरून निघणारे नाही. आबे हे केवळ भारतासाठी एक भक्कम व सच्चे राजकीय मित्रच नव्हते तर भारतातल्या अनेक स्वप्नवत प्रकल्पांच्या उभारणीतील ते भागीदारही होते. जपानचे अर्थकारण सुधारण्यासाठी आबे यांनी भारतात जपानची गुंतवणूक मुक्त हस्ते पाठवत भारताच्या अर्थकारणाला चालना मिळण्यासाठी मोठी मदत केली होती.

भारत व जपान हे दीर्घकाळचे परस्पर नैसर्गिक मित्र आहेत. त्यामागे बौद्ध धर्माचा वारसा, सुभाषचंद्र बोस यांचे युद्धकारण आणि इतर बरीच कारणे आहेत. मात्र, तरीही आबे पंतप्रधानपदी आल्यावर जपान-भारत मैत्रीचा नवा अध्याय सुरू झाला. डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात जपान-भारत मैत्री बहरण्यास सुरुवात झाली आणि नरेंद्र मोदी यांच्या काळात या मैत्रीला धुमारे फु टले. यात मोदी व आबे यांच्यातील वैयक्तिक मित्रसंबंधांचा मोठा वाटा नक्कीच आहे. मात्र, मोदी व आबे यांचे सूर व्यवस्थित जुळले होते. चीनच्या विखारी विस्तारवादाच्या विरोधात अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया व भारत या जगातल्या प्रमुख चार देशांनी एकत्र आले पाहिजे ही परखड भूमिका आबे यांनी अत्यंत निर्भीडपणे मांडली व आपल्या स्नेहसंबंधाची जोड देत ‘क्वाड’ संंघटनेचे पुनरुज्जीवन करण्यात त्यांनी यश मिळविले. चीनबाबत उघड व निर्भीड भूमिका घेणे व ठामपणे ती आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडणे हे जपानचे पंतप्रधान म्हणून आबे यांचे ठळक वेगळेपण! डोकलाममध्ये चिनी लष्कराने घुसखोरी केल्यानंतर भारताच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे आबे हे जगातील पहिले राष्ट्रप्रमुख होते. ‘क्वाड’चे पुनरुज्जीवन झाल्याने म्हणूनच चीनचा प्रचंड जळफळाट झाला आहे. कारण जागतिक राजकारणावर पुढची अनेक दशके या ‘क्वाड’चा मोठा प्रभाव राहणार आहे. जपानचे अर्थकारण सावरण्यासाठी आबे यांनी भारतात गुंतवणुकीचा व मदतीचा मोठा ओघ सुरू केला. त्याचा भारताला मोठा फायदा झाला, हे मान्यच करावे लागेल.

आबे यांनी अत्यंत ठोस धोरणे राबवून जपानला कित्येक वर्षांच्या आर्थिक मरगळीच्या स्थितीतून बाहेर काढले. त्याचबरोबर देशाचे वर्षानुवर्षांचे शांतताकेंद्री, तटस्थ सामरिक धोरण आक्रमक करण्याचे, जपानच्या राष्ट्रवादाला प्राधान्य मिळवून देण्याचे श्रेय निर्विवादपणे शिंजो आबे यांना जाते. जगाला ग्रासून टाकणा-या कोरोना संकटावर मात करत विलंबाने का असेना पण यशस्वीपणे ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन हा त्यांच्या शिरपेचातील आणखी एक मानाचा तुरा! शिंजो आबे हे त्यांच्या घराण्यातले तिसरे उच्चपदस्थ! त्यांचे आजोबा नोबेसुके किशी हे जपानचे माजी पंतप्रधान तर त्यांचे वडील शिंतारो आबे हे माजी परराष्ट्रमंत्री राहिलेले आहेत. १९९३ साली प्रथम ते डेमोक्रॅटिक पक्षाच्या तिकिटावर पार्लमेंटच्या प्रतिनिधीगृहाच्या निवडणुकीत निवडून आले. २००५ मध्ये जपानचे तत्कालीन पंतप्रधान जुनुचिरो कोइझुमी यांनी त्यांना चीफकॅबिनेट सेक्रेटरी या अत्यंत महत्त्वाच्या पदावर नियुक्त केले. २००६ मध्ये अत्यंत अनपेक्षितपणे ते जपानचे सर्वांत तरुण पंतप्रधान बनले. मात्र, ढिसाळ कारभार व अनुभवाचा अभाव यामुळे त्यांचा वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर काही आठवड्यांत पोटाचा विकार बळावल्याने त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. जपानमध्ये तो काळ राजकीय व आर्थिक अस्थैर्याचा होता. लेमान ब्रदर्स बँकेच्या पतनानंतर झालेल्या मोठ्या आर्थिक भूकंपाचे धक्के जपानलाही सोसावे लागले. त्यामुळे जपानची अर्थव्यवस्था दीर्घकाळ गोठलेली व मंदीसदृश अवस्थेत होती.

राजकीय अस्थैर्य व आर्थिक दिशाहिनतेला वैतागलेल्या जपानी नागरिकांना ‘टेक बॅक जपान’ अशी जोरदार साद शिंजो आबे यांनी घातली व त्यांना नवी स्वप्ने दाखवली. २०१२ च्या निवडणुकीत शिंजो आबे यांचा लिबरल डेमॉक्रॅटिक पक्ष मोठ्या बहुमताने सत्तेवर आला. पुढे २०१४ व २०१७ मधील निवडणुकीत विजय प्राप्त करत आबे यांनी जपानमध्ये सर्वाधिक काळ पंतप्रधानपदावर राहण्याचा सन्मान प्राप्त केला. २०२० मध्ये प्रकृतीच्या कारणामुळे ते राजीनामा देऊन पंतप्रधानपदावरून पायउतार झाले. त्यांनी राजीनामा दिला नसता तर त्यांच्यावर हल्ला होण्याच्या घटनेपर्यंतही ते पंतप्रधानपदावर कायम राहिले असते. असो! आबे यांनी जपानच्या अर्थकारणातील काटकसरीच्या धोरणाला फाटा देत चलनतरलता, आर्थिक चालना आणि संस्थात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी मोठा पुढाकार घेतला. स्वस्त कर्जे, सरकारी खर्च आणि वैयक्तिक मागणीला चालना दिली. देशातील पायाभूत सुविधांसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला. यामुळे जपानची अर्थव्यवस्था मरगळलेल्या अर्थव्यवस्थेतून बाहेर आली. २०१५ ते २०१७ या वर्षांत सलग आठ तिमाहींमध्ये जपानच्या अर्थव्यवस्थेने निव्वळ विकास नोंदविला. त्याआधीच्या तीन दशकांमध्ये कधी असे झाले नव्हते.

अर्थकारणाबरोबरच चीनच्या परराष्ट्र व सामरिक धोरणात आबे यांनी मोठी आक्रमकता आणली. त्यातून पाश्चात्त्यांच्या आश्रितपणातून जपानला बाहेर काढत जागतिक पटलावर जपानचे स्वतंत्र अस्तित्व त्यांनी अधोरेखित केले. हे त्यांचे काम जपान देश म्हणून कधीही विसरू शकणार नाही. राष्ट्राच्या अर्थकारणातील महिलांचा सहभाग वाढविण्यासाठीची धोरणे त्यांनी राबविली. शिंजो आबे काही काळ निप्पॉन कायगी या अति उजव्या विचारसरणीच्या संघटनेचे सदस्य होते. त्यामुळे विरोधक त्यांच्यावर उजव्या विचारसरणीचा उघडपणे पुरस्कार करणारा नेता असा आरोप लावायचे. मात्र, आबे यांनी त्याची चिंता धोरणे राबविताना केली नाही आणि जपानी जनतेनेही या आरोपांना फारसा थारा दिला नाही. मित्राला साथ देऊन जपान जगात नव्या महाशक्तीचा उदय घडवू शकतो यावर विश्वास ठेवणा-या या नेत्याने त्या विश्वासातूनच भारतासोबतचे जपानचे मैत्री संबंध सर्वोच्च पातळीवर नेऊन ठेवले होते. जागतिक राजकारणात आबे हे भारताचे सच्चे मित्र होते. त्यांच्या हत्येने जपानने द्रष्टा नेता गमावला व भारताने सच्चा मित्र! आबे यांना ‘एकमत’ची भावपूर्ण श्रद्धांजली!

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या